₹१,००,१०१ ची देणगी, सभामंडप उभारणीचे शंभर टक्के आश्वासन
हिंगोली/गोपाल सातपुते
हिंगोली | अमावस्येनिमित्त संत बाळूमामा देवस्थान शेंबाळपिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धार्मिक सोहळ्यात हिंगोली जिल्ह्याचे राज्यसभा खासदार डॉ रामरावजी वडकुते यांनी उपस्थित राहून श्री बाळूमामांच्या महाआरतीचा लाभ घेतला. हजारो भाविक, माता-भगिनी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला.
तिरुपती येथून रात्री सुमारे आठ वाजता हिंगोली येथे पोहोचल्यानंतर शेंबाळपिंपरी येथे अमावस्या निमित्त आयोजित महाआरतीस उपस्थित राहण्याचा भक्तांचा आग्रह होता. तो बाळूमामांचा आदेश समजून आपण या कार्यक्रमास उपस्थित राहिलो, असे खासदार वडकुते यांनी सांगितले. यावेळी त्यांचा भाविकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
रात्री बारा वाजता खासदार रामरावजी वडकुते यांच्या शुभहस्ते श्री बाळूमामांची महाआरती संपन्न झाली. यावेळी त्यांनी देवस्थानासाठी रोख ₹१ लाख १०१ (एक लाख एकशे एक रुपये) देणगी जाहीर केली. तसेच देवस्थानाच्या सभामंडपाच्या उभारणीसाठी शंभर टक्के सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी उपस्थित भाविकांना संबोधित करताना खासदार रामरावजी वडकुते म्हणाले, “मी आज बाळूमामांच्या आशीर्वादाने राज्यसभा खासदार आहे. त्यांच्या कृपेनेच मला जनसेवेची संधी मिळाली. त्यांच्या चरणी सेवा करण्याचा आणि महाआरती करण्याचा लाभ मिळणे, हे माझ्या आयुष्यातील अत्यंत भाग्याचे क्षण आहेत.”
या प्रसंगी उपस्थित भाविकांनी “बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांगभलं… चांगभलं!” असा जयघोष करत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. धार्मिक श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने भरलेल्या या सोहळ्याने शेंबाळपिंपरी परिसरात अविस्मरणीय वातावरण निर्माण झाले.