जिल्हास्तरीय यशानंतर मराठवाडा विभागीय स्पर्धेतही प्रथम क्रमांक
सिल्लोड : बुद्धिबळाच्या पटावर आपल्या बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची प्रभावी छाप उमटवत सरस्वती विद्यालय, तळणी येथील विद्यार्थिनी कु. धनश्री गणेश ठोंबरे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर तिने मराठवाडा विभागीय स्तरावरील स्पर्धेत प्रवेश मिळवला. या संधीचे सोने करत धनश्रीने विभागीय स्पर्धेतही दमदार कामगिरी बजावत प्रथम क्रमांक पटकावला. धनश्रीने आपल्या अचूक चाली, शांत संयम आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत हे यश मिळवले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सरस्वती विद्यालय, तळणीच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. धनश्रीच्या या उज्ज्वल यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य अशोक गरुड, संस्था उपाध्यक्ष श्री सतीश देशमुख आदी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले. तिच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि धनश्रीची मेहनत व जिद्द यांचा मोलाचा वाटा असल्याचे कौतुकाने नमूद करण्यात आले. या यशामुळे सरस्वती विद्यालयसह सिल्लोड तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.