सर्पमित्रांच्या अथक प्रयत्नातून अजगराचे यशस्वी रेस्क्यू; जंगल परिसरात सुरक्षित अधिवासात सोडले
अजिंठा प्रतिनिधी सय्यद जमीर
अजिंठा प्रतिनिधी सय्यद जमीर
सिल्लोड : तालुक्यातील अजिंठा वनविभागाच्या हद्दीतील राजनी
शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या सुमारे सहा ते सात फूट लांबीच्या अजगराला वनविभाग आणि सर्पमित्रांच्या संयुक्त प्रयत्नातून मंगळवारी (दि. ६) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. रेस्क्यू केलेल्या अजगराला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली जंगल परिसरात सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले.
राजनी शिवारातील रफीक पठाण यांच्या शेतातील विहिंरीत अजगर पडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती वनविभागाला मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांनी तात्काळ दखल घेत शिवना वनपाल दीपक सोनार यांच्यासह वनविभागाच्या पथकाला घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मांडणा येथील सर्पमित्र रामेश्वर गाडेकर तसेच सर्पमित्र सोनवणे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विहिंरीची पाहणी करण्यात आली. अजगर विहिंरीच्या तळाशी असल्याने त्याला बाहेर काढणे आव्हानात्मक होते. मात्र, सर्पमित्रांनी आवश्यक साधनांच्या मदतीने विहिंरीत उतरून अत्यंत सावधगिरीने अजगराला ताब्यात घेतले. कोणतीही इजा होऊ न देता त्याचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले.
रेस्क्यू केलेला अजगर अंदाजे सहा ते सात फूट लांबीचा असून त्याचे वय सुमारे सहा ते सात वर्षे असावे, अशी माहिती सर्पमित्र रामेश्वर गाडेकर यांनी दिली. रेस्क्यू केल्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अजगराला जंगल परिसरात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
साप आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन
घराच्या परिसरात अथवा शेतशिवारात साप आढळल्यास त्याला मारू नये. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी तात्काळ वनविभाग किंवा अधिकृत सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू
अजगर रेस्क्यू मोहीम अजिंठा वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनविभागाची तत्परता आणि सर्पमित्रांच्या धाडसी प्रयत्नांमुळे अजगराला जीवदान मिळाले. त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अजिंठा येथील आरिफ खान, शिवना वनपाल दीपक सोनार, वसई वनरक्षक सोनवणे, वनरक्षक सिद्धार्थ वैष्य, वनरक्षक दिनेश वाघ यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी व सर्पमित्र उपश्टित होते.