header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

‘एम-मित्रा’ आणि ‘स्वास्थ कदम’ कार्यक्रमाचा शुभारंभ

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002451561.jpg

गरोदर माता, स्तनदा माता व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल मार्गदर्शनाची सुविधा

छत्रपती संभाजीनगर : अरमान संस्था, एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र शासन आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गरोदर माता, स्तनदा माता आणि तीन वर्षांखालील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘इंटिग्रेटेड अप्रोच एम-मित्रा आणि स्वास्थ कदम’ कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाले.

बालकाच्या आयुष्यातील पहिल्या एक हजार दिवसांचे महत्त्व लक्षात घेऊन राबविण्यात येणारा हा कार्यक्रम गरोदर माता व तीन वर्षांखालील बालकांच्या पालकांना पोषण, आरोग्य, स्तनपान, पूरक आहार, बालसंगोपन आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात शास्त्रीय व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणार आहे. कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना व्हॉट्सअॅप सेवेद्वारे माहितीपर व्हिडिओ व संदेश, तसेच लाईव्ह टेलिकाऊन्सेलिंगद्वारे तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे माता व बालकांच्या आरोग्यविषयक ज्ञानात वाढ होऊन “सुदृढ माता – सुदृढ बालक” हे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे.

या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माता व बालकल्याण विभागीय उपायुक्त कृष्णा राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) डॉ. मंगला पांचाळ, जिल्हा रुग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. भारती नागरे, डॉ. पवन बालचकित, बाल विकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर खडसे, गणेश अंधारे, माधुरी भंडारी, अरमान संस्थेच्या कार्यक्रम संचालिका डॉ. शिल्पा जैन, वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. आकाश शिंदे तसेच कार्यक्रम अधिकारी मोहसीन कतनाळी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी बालकाच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस हे आरोग्यदायी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. स्तनपानामध्ये अडचणी येणाऱ्या बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल होण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. योग्य पोषण, नियमित आरोग्य तपासणी, स्तनपान आणि बालसंगोपनाविषयीची योग्य माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘इंटिग्रेटेड अप्रोच एम-मित्रा आणि स्वास्थ कदम’ कार्यक्रम प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरमान संस्थेच्या जिल्हा समन्वयक ओशिन पीटर, सुपरवायझर प्रतिभा व मीनाक्षी, तसेच क्षेत्रीय समन्वयक लता साबळे, जुनेद सय्यद, योगिता दाभाडे, सीमा गायकवाड, रागेश्वरी आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90