header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जेजे प्लस हॉस्पिटलमध्ये २० वर्षीय विद्यार्थ्याचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

मुलासाठी आईचे किडनीदान; चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर विद्यार्थ्याला मिळाले नवजीवन

हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील रुग्णांसाठी विश्वासार्ह उपचार केंद्र म्हणून ओळख असलेल्या जेजे प्लस हॉस्पिटलमध्ये अत्यंत गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितीत २० वर्षीय विद्यार्थ्याचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या करण्यात आले. आपल्या मुलाला नवजीवन मिळावे यासाठी आईने स्वतःची किडनी दान करून मातृत्वाचा सर्वोच्च आदर्श घालून दिला.

गेल्या दीड वर्षांपासून संबंधित विद्यार्थी डायलिसिसवर होता. त्याची हृदयाची कार्यक्षमता कमी होती तसेच वारंवार गंभीर संसर्ग होत असल्याने प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक मानली जात होती. प्रत्यारोपणापूर्वी कार्डिओलॉजी, संसर्गरोग व नेफ्रोलॉजी विभागातील तज्ज्ञांनी संयुक्तपणे सर्व आवश्यक तपासण्या व उपचार पूर्ण केले. त्यानंतर सुमारे चार तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे किडनी प्रत्यारोपण यशस्वी करण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर अतिदक्षता विभागात विशेष देखरेख ठेवण्यात आली. नवीन किडनी उत्तम प्रकारे कार्यरत असून विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुग्णालयातून रजा देण्यात आली असून सध्या आई आणि मुलगा दोघेही नियमित फॉलो-अपसाठी रुग्णालयात येत आहेत.

जेजे प्लस हॉस्पिटलचे संचालक व मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. जीवन राजपूत यांनी यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले. “रुग्णाला केवळ उपचार नव्हे, तर नवजीवन देणे हेच जेजे प्लस हॉस्पिटलचे ध्येय आहे. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि समर्पित वैद्यकीय पथकाच्या एकत्रित प्रयत्नातून अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होतात. अवयवदान ही सर्वोच्च मानवसेवा असून अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करून अनेकांना जीवनदान द्यावे,” असे त्यांनी सांगितले.

नेफ्रोलॉजिस्ट डॉ. गौरी कुलकर्णी यांनी सांगितले की, कमी हृदय कार्यक्षमता आणि गंभीर संसर्गाचा इतिहास असलेल्या रुग्णाचे प्रत्यारोपण हे मोठे आव्हान होते. मात्र योग्य नियोजन, वेळेवर उपचार आणि विविध तज्ज्ञांच्या समन्वयातून हे यश मिळाले. त्यामुळे हा विद्यार्थी आता डायलिसिसमधून मुक्त होऊन पुन्हा शिक्षण सुरू करू शकणार आहे.

युरो सर्जन डॉ. शरद सोमानी आणि डॉ. अरुण चिंचोले यांनी सांगितले की, अशा उच्च-जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणे ही जेजे प्लस हॉस्पिटलच्या वैद्यकीय क्षमतेची साक्ष आहे.

या प्रत्यारोपण प्रक्रियेत नेफ्रोलॉजिस्ट डॉ. गौरी कुलकर्णी, युरो सर्जन डॉ. शरद सोमानी, डॉ. अरुण चिंचोले तसेच आयसीयू, कार्डिओलॉजी, इन्फेक्शन कंट्रोल आणि नर्सिंग विभागाच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. 

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90