मीच आणला रस्ता सांगण्यासाठी अब्दुल सत्तार आणि इद्रिस मुलतानी यांच्यात रंगलाय क्रेडिट वॉर तमाशा जनतेच्या पैशांवर नेत्यांची फुशारकी
शेख हक्कानी फर्दापूर प्रतिनिधी
फर्दापूर गेली ४० वर्षे ज्या सावळदबारा परिसरातील जनतेने रस्ता नसल्यामुळे खड्डे धूळ आणि चिखल तुडवला त्या जनतेच्या नशिबी आता निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचा राजकीय तमाशा पाहण्याची वेळ आली आहे गोद्री पळसखेडा टिटवी सावळदबारा या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील मिळताच हा रस्ता मीच मंजूर केला अशी छाती बडवण्यासाठी विद्यमान आमदार अब्दुल सत्तार आणि भाजपचे नेते इद्रिस मुलतानी यांच्यात नारळ फोडण्याची जीवघेणी शर्यत लागली आहे
गेली अनेक दशके शांत असलेल्या या जंगलात सध्या प्राण्यांपेक्षा नेत्यांच्या गाड्यांच्या आणि त्यांच्या ‘कॅमेऱ्यांच्या फ्लॅश’चाच सुळसुळाट जास्त पाहायला मिळत आहे
सत्तार साहेबांची ‘हॅट्रिक’ की हवेतच उद्घाटने
सत्तार गटाचा दावा आहे की हा रस्ता आम्ही २० फेब्रुवारी २०२३ रोजीच मंजूर करून आणला होता पण मग प्रश्न असा पडतो की जर रस्ता आधीच मंजूर होता तर आजवर तो वनविभागाच्या लालफितीत का सडत होता विरोधकांच्या म्हणण्यानुसार सत्तार साहेबांनी गेल्या काही वर्षांत या रस्त्याचे तब्बल तीन वेळा कागदोपत्री आणि हवेतल्या हवेत’ उद्घाटन करून जनतेच्या डोळ्यात नुसती धूळफेक केली आहे आता जेव्हा खरंच काम सुरू होण्याची वेळ आली तेव्हा सत्तार साहेब अचानक जंगलात पायी फेऱ्या मारून मीच तारणहार असल्याचा आव आणत आहेत
मुलतानींचा जंगल सफारी’ ते ‘दिल्ली दरबार ड्रामा
दुसरीकडे इद्रिस मुलतानी यांनी तर या ‘क्रेडिट वॉर मध्ये पूर्ण ताकद झोकून दिली आहे सत्तार हे फक्त खोटे नारळ फोडतात मी प्रत्यक्ष काट्याकुट्यातून पायी चालून पाहणी केली असा दावा करत मुलतानींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात’ हजेरी लावली मी ३ महिन्यात वनविभागाची मंजुरी आणली अशी गर्जना करत मुलतानी गट आता गावभर पेढे वाटत सुटला आहे
जंगलात फक्त फेऱ्या आणि फोटोबाजी
सध्या या दोघांचेही कार्यकर्ते सोशल मीडियावर आमचाच नेता कसा भारी हे दाखवण्यासाठी भिडले आहेत प्रत्यक्षात वन संवर्धन कायद्यानुसार हा रस्ता वनविभागाच्या अखत्यारीत येतो जोपर्यंत वन विभाग झोपेतून उठून कायदेशीर मंजुरी देत नाही तोपर्यंत कुठल्याही नेत्याची ताकद नाही की तिथे तो एक दगडही हलवू शकेल
पण निवडणुका तोंडावर आल्याने कुणालाही या तांत्रिक प्रक्रियेशी देणंघेणं नाही जनतेचा टॅक्सचा पैसा आणि प्रशासनाची मंजुरी पण पाटी लावायला मात्र हे दोघेही नेते हातात खोरे पावडे घेऊन जंगलात फोटोबाजी करत सुटले आहेत
जनता विचारतेय खरा बाप कोण
४० वर्षे या रस्त्यासाठी वनविभागाचे उंबरठे झिजवणारे सामान्य नागरिक आणि शासन दरबारी खेटे मारणारे खरे लोक उघड्यावरच आहेत आता रस्ता प्रत्यक्षात उतरत असताना या रस्त्याचा बाप मीच हे सिद्ध करण्यासाठी सुरू असलेली ही ‘राजकीय कुस्ती’ पाहून सामान्य जनता मात्र गालातल्या गालात हसत आहे
जनतेला चांगलंच माहिती आहे की रस्ता ना सत्तार साहेबांच्या खिशातून आलाय ना मुलतानींच्या हा रस्ता जनतेच्या घामाच्या पैशातून बनत आहे त्यामुळे या नेत्यांनी श्रेयाची मलाई खाण्यापेक्षा काम दर्जेदार कसं होईल याकडे लक्ष दिलं तर जास्त बरं होईल