header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

मांजरांच्या हल्ल्यांतही वाढ; नऊ महिन्यांत १,८३३ जणांना चावा

घाटीत दहा महिन्यांत १०,६३३ श्वानदंशाचे रुग्ण; बिबट्या, माकडे, लांडग्यांसह उंदीर, मुंगूस, डुक्कर, घोड्यांचेही हल्ले

हिंदू प्रकाशवार्ता  : प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे सत्र सुरू असतानाच आता मांजरांच्या हल्ल्यांची संख्याही चिंताजनकपणे वाढली आहे. घाटी रुग्णालयातील नोंदीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत तब्बल १,८३३ जणांना मांजरांनी चावा घेतला, तर जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान १०,६३३ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने उपचारासाठी घाटीत यावे लागले. विशेष म्हणजे बिबट्या, माकड, लांडगा यांसारख्या जंगली प्राण्यांसह उंदीर, मुंगूस, पाल, डुक्कर आणि घोड्यांच्या हल्ल्यांतील रुग्णांचीही नोंद होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घाटीतील वार्ड क्रमांक १० मध्ये प्राणीहल्ल्यांनंतर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची नोंद केली जाते. त्यानुसार जानेवारीत १,३४७ श्वानदंश आणि २०६ मांजरदंश, फेब्रुवारीत १,१७४ श्वानदंश आणि २०८ मांजरदंश, मार्चमध्ये १,२८४ श्वानदंश आणि १९० मांजरदंश नोंदविण्यात आले.

एप्रिलमध्ये १,१४९ कुत्रे आणि १७९ मांजरे, मेमध्ये १,२०० कुत्रे आणि १८३ मांजरे, जूनमध्ये १,१३४ कुत्रे आणि २३४ मांजरे, जुलैमध्ये १,०७५ कुत्रे आणि २१७ मांजरे, ऑगस्टमध्ये १,१४४ कुत्रे आणि २३५ मांजरे, तर सप्टेंबरमध्ये १,१३६ कुत्रे आणि १८१ मांजरे यांच्या हल्ल्यांची नोंद झाली.

जंगली प्राण्यांकडूनही धोका

नैसर्गिक अधिवासात होणारे बदल, जंगलतोड आणि मानवी वस्त्यांचा वाढता विस्तार यामुळे जंगली प्राण्यांचा मानवी वस्त्यांशी संपर्क वाढत आहे. बिबट्या, लांडगा आणि माकडांच्या हल्ल्यांबरोबरच उंदीर, मुंगूस, पाल, डुक्कर आणि घोड्यांच्या हल्ल्यांतील नागरिकही घाटीत उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे केवळ भटक्या कुत्र्यांचाच नव्हे, तर विविध प्राण्यांपासून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.

घाटीत १० हजार अँटी रेबीज इंजेक्शनचा साठा

प्राणी चावल्यानंतर रेबीजचा धोका लक्षात घेऊन घाटीत उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या पुढाकाराने रुग्णालयात १० हजार अँटी रेबीज इंजेक्शनचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. दररोज सुमारे ३५ ते ४० रुग्णांना या लसीचा लाभ मिळत आहे. त्यामुळे प्राण्याने चावा घेतल्यानंतर जखम किरकोळ असल्याचे समजून दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90