अधिकारी एसीत झोपेत पोलीस घामाघूम आणि पर्यटक वाऱ्यावर शासनाचे खिसे भरतायत पण स्थानिक गरिबांवर मात्र उपाशी मरण्याची वेळ
फर्दापूर प्रतिनिधी शेख हक्कानी
जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अजिंठा घाट आता पर्यटनस्थळ राहिला नसून प्रवाशांसाठी नरकयातनांचा अड्डा बनला आहे शनिवारी सलग तीन तास झालेल्या भयंकर ट्रॅफिक जॅमने हजारो वाहने अशी काही अडकली की जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या देश विदेशातील पर्यटकांना अक्षरश रडकुंडीला आणले वारंवार होणाऱ्या या जीवघेण्या कोंडीमुळे अजिंठा लेणीकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या आधीच १ टक्क्यावर घसरली आहे मात्र निर्ढावलेल्या प्रशासनाने वेळीच डोळे उघडले नाहीत तर हे पर्यटन लवकरच झिरो ०% टक्क्यावर गेल्याशिवाय राहणार नाही असा संतापाचा स्फोट आता स्थानिक नागरिकांमधून होत आहे
नेमके काय घडले
शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घाटातील घोडी पटांगण येथे तब्बल तीन अवजड वाहने एकाच वेळी नादुरुस्त झाली घाटातील अरुंद रस्ता आणि त्यातच या अवाढव्य वाहनांनी रस्ता अडवल्याने महामार्गाची अक्षरश नाकेबंदी झाली बघता बघता वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या भर उन्हात लहान मुले महिला आणि वृद्ध प्रवासी तासन्तास गाडीत कोंडले गेले होते आम्ही जागतिक वारसा पाहायला आलोय की या घाटात नरकयातना भोगायला असा संतप्त सवाल पर्यटक विचारत होते मात्र टोल वसुली करणारे आणि रस्ते दुरुस्तीचे ढोल बडवणारे प्रशासन या सगळ्याकडे डोळेझाक करत होते
पोलिसांची धावपळ प्रशासनाची कुंभकर्ण झोप
कोंडीची माहिती मिळताच फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली एकीकडे संबंधित विभागाचे अधिकारी आपल्या वातानुकूलित AC केबिनमध्ये झोपा काढत असताना सपोनि मोटे यांच्यासह पोलीस कर्मचारी फिरोज तडवी स्वप्निल चव्हाण दिपक घन भास्कर गव्हांडे संदीप बिरारे आणि मदतनीस यांनी भर उन्हात घामाच्या धारा गाळत जिवाचे रान केले अत्यंत शिताफीने लहान वाहने बाजूला करून त्यांनी एकेरी वाहतूक सुरू केली क्रेनच्या साहाय्याने वाहने बाजूला करून दुपारी १ वाजेपर्यंत पोलिसांनी रस्ता मोकळा केला पोलीस जर नसते तर रात्रीपर्यंत हा रस्ता मोकळा झाला नसता अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली
शासन फक्त महसूल ओरबडणार गरिबांचे काय
अजिंठा घाटात कधी ३-४ तास तर कधी चक्क १४-१४ तास वाहतूक ठप्प होणे ही आता नित्याचीच डोकेदुखी झाली आहे या भयानक त्रासामुळे पर्यटकांनी लेणीकडे पाठ फिरवली आहे यावर स्थानिक व्यावसायिकांनी शासनावर जोरदार प्रहार केला आहे
शासनाला महसूल ओरबडण्यासाठी हजारो दरवाजे आहेत पण आमच्यासारख्या गरिबांचे पोट भरण्याचा एकमेव आधार ही अजिंठा लेणी आहे जर इथल्या थर्ड क्लास रस्त्यांमुळे पर्यटकच आले नाहीत तर इथल्या टॅक्सीचालक गाईड आणि छोट्या दुकानदारांनी काय आत्महत्या करायची का शासन आपल्या नाकर्तेपणाने आमच्या गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेत आहे असा टाहो स्थानिकांनी फोडला आहे
अजिंठा लेणीच्या नावावर लाखो करोडो रुपये छापणाऱ्या निर्ढावलेल्या प्रशासनाने आता तरी कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे अजिंठा घाटातील या वाहतूक कोंडीवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा संतप्त स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा खणखणीत इशारा देण्यात आला आहे