header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

*जिंतूर तालुक्यात अवैध सावकारीचा विळखा घट्ट; सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त, एका सराफ व्यापाऱ्याला गाव सोडण्याची वेळ*

केवळ 12 अधिकृत सावकार, शेकडो बेकायदेशीर; फायनान्सच्या नावाखाली सुरू आहे लूट*

पीडितांनी लेखी तक्रार करावी – सहकार निबंधक नांदापूरकर यांचे आवाहन*

सचिन रायपत्रीवार**जिंतूर (जि. परभणी) प्रतिनिधी :-*

जिंतूर तालुक्यात सध्या अवैध सावकारीने डोके वर काढले आहे. शहरासह बोरी, चारठाणा, येलदरी, इटोली, आडगाव, बामणी, भोगाव, वागदरवाडी या मोठ्या गावांमध्ये शेती, लग्न, आजारपण आणि शिक्षणासाठी गरजू लोकांना हाताशी धरून अव्वाच्या सव्वा व्याज आकारले जात आहे. 10 टक्क्यांपासून ते 20 टक्के प्रतिमहिना इतके चक्रवाढ व्याज लावून सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे.

*वसुलीसाठी गुंडांचा वापर, दंडेलशाही*

या अवैध सावकारांकडून केवळ व्याजच नव्हे, तर वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून दमदाटी, शिवीगाळ, घरासमोर तमाशा करणे, कोऱ्या चेकवर आणि स्टॅम्प पेपरवर सह्या घेणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. कर्ज घेतलेल्या रकमेपेक्षा कित्येक पट व्याज वसूल करूनही मूळ रक्कम तशीच ठेवली जाते.

*एका सराफ व्यापाऱ्याला गाव सोडून पलायन करावे लागले*

या जाचाचे ताजे उदाहरण म्हणजे जिंतूर शहरातील एका प्रतिष्ठित सराफ व्यापाऱ्याचे आहे. अवैध सावकारांच्या सततच्या त्रासाला आणि दंडेलशाही वसुलीला कंटाळून या व्यापाऱ्याला अखेर आपले घरदार, दुकान सोडून गावातून पळ काढावा लागला आहे. त्याने घेतलेल्या रकमेपेक्षा दुप्पट-तिप्पट रक्कम परत करूनही त्याचा छळ थांबत नव्हता, असे नागरिकांतून बोलले जात आहे. या घटनेमुळे तालुक्यातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

*अधिकृत फक्त 12, अनधिकृत शेकडो*

या प्रकरणी आम्ही सहकार निबंधक, सहकारी संस्था, जिंतूर कार्यालयात माहिती घेतली असता धक्कादायक वास्तव समोर आले. संपूर्ण जिंतूर तालुक्यात शासनमान्य *केवळ 12 अधिकृत सावकार* परवाना धारक आहेत. त्यामध्येही निम्म्याहून अधिक परवाने हे सोने तारण ठेवून कायदेशीर सावकारी करणाऱ्या सराफ व्यावसायिकांकडे आहेत. ते शासनाच्या नियमानुसारच व्याज घेतात आणि दरवर्षी त्यांचे हिशोब तपासले जातात.

मात्र प्रत्यक्षात शहरात आणि गावागावात फायनान्स, मायक्रो फायनान्स, रोजगार बचत गट आणि खाजगी सावकारीच्या नावाखाली शेकडो लोक बिनापरवाना हा व्यवसाय करत आहेत. त्यांनी सहकार विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही.

*कायदा काय सांगतो?*

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 नुसार, परवान्याशिवाय सावकारी करणे हा फौजदारी गुन्हा आहे. विनापरवाना सावकारी केल्यास 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. तसेच परवाना असूनही जास्त व्याज आकारल्यास परवाना रद्द करण्याचा अधिकार सहकार निबंधकांना आहे.

*प्रशासनाचे आवाहन – घाबरू नका, लेखी तक्रार करा*

याबाबत सहकार निबंधक नांदापूरकर यांनी स्पष्ट केले की, “आमच्याकडे नोंद असलेल्या 12 परवानाधारकांचे आम्ही दरवर्षी ऑडिट करतो. पण अवैध सावकारांच्या विरोधात जोपर्यंत पीडित व्यक्ती समोर येऊन लेखी तक्रार देत नाही, तोपर्यंत आम्हाला कारवाई करणे अवघड जाते. लोक घाबरतात आणि तक्रार देत नाहीत, याचाच गैरफायदा हे अवैध सावकार घेतात.”

“जर कोणाला अवैध सावकाराने त्रास दिला असेल, जास्त व्याज घेतले असेल, तर त्यांनी आमच्या कार्यालयात येऊन लेखी अर्ज द्यावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून आम्ही संबंधित सावकारावर कडक कायदेशीर कारवाई करू आणि पोलिसात गुन्हाही दाखल करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.

तरी तालुक्यातील जनतेने अवैध सावकारांच्या जाळ्यात अडकू नये आणि अडकले असल्यास तात्काळ सहकार विभाग, जिंतूर किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90