खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेत; विक्रीसाठी तयार साठा सील
जिंतूर, प्रतिनिधी : खाद्यतेलाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (ता. १६) जिंतूर शहरातील तीन तेल पॅकिंग कारखान्यांवर संयुक्त कारवाई केली. या कारवाईत खुल्या तसेच पॅकिंग केलेल्या तेलाचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत विक्रीसाठी तयार असलेला तेलाचा साठा सील करण्यात आला आहे.
शहरातील रस्त्यावरील अन्य कारखान्यावर छत्रपती संभाजीनगर व परभणी येथील अन्न सुरक्षा विभागाच्या पथकांनी एकाच वेळी तपासणी केली. विविध ठिकाणांहून टँकरद्वारे आणलेले खुले तेल पाऊच व कॅनमध्ये भरून स्वतःच्या ब्रँडने विकले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली.
लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीतील ‘लक्ष्मी गोल्ड’ आणि अथर्व एजन्सीजमधील ‘हेल्दी नेचर’ वरद ऑइल या ब्रँडच्या तेलाचे नमुने घेण्यात आले. १५ किलो, १५ लिटर आणि एक लिटर पॅकिंगमधील विक्रीसाठी तयार तेलाचे बॉक्स सील करून संबंधित चालकांना विक्री न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सायंकाळपर्यंत कारवाई सुरू असल्याने सील केलेल्या तेलाचे एकूण प्रमाण स्पष्ट झाले नव्हते. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी श्रीकांत करकाळे यांनी सांगितले.