header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

अल्टिमेटमवर अल्टिमेटम, तरी नाले गाळातच; पावसाआधीच महापालिकेच्या तयारीची पोलखोल

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002466288.jpg

 दोन महिन्यांपासून आदेश, पाहण्या आणि बैठका सुरू; नालेसफाईचे काम अद्याप अपूर्णच

सिद्धेश्वर थोर

 छत्रपती संभाजीनगर  : शहरात पावसाळ्याची सुरुवात झाली असली तरी महापालिकेची नालेसफाई मात्र अजूनही अर्धवटच असल्याचे वास्तव समोर आले आहे. स्थायी समिती सभापतींनी वारंवार पाहणी करून अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिले, कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले; मात्र अनेक नाले आजही गाळ, कचरा आणि अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले आहेत. त्यामुळे पावसापूर्वी सर्व तयारी पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. बैठका, पाहणी दौरे, आढावा बैठका आणि आदेशांचा धडाका सुरू असतो. मात्र यंदाही प्रत्यक्षात नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र शहरभर दिसत आहे.

विशेष म्हणजे ७ मे रोजी मोती कारंजा ते संभाजी पेठ परिसरातील नाल्यांची तातडीने सफाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर अनेकदा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र १७ जून रोजी झालेल्या पाहणीत नालेसफाईचे अवघे ५० टक्के काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित कामाचे काय झाले, हा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

शहरातील अनेक भागांत नाल्यातील गाळ उपसून तो नाल्याच्या कडेलाच टाकण्यात आला आहे. हा गाळ उचलण्याचे कामही पूर्ण झालेले नाही. परिणामी पहिल्याच जोरदार पावसात हा सर्व गाळ पुन्हा नाल्यात जाणार असून संपूर्ण नालेसफाई प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे लाखो रुपयांचा खर्च अक्षरशः पाण्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोती कारंजा, गांधीनगर, औषधी भवन, संभाजीपेठ, नाथ मार्केट, दुल्हा-दुल्हन चौक, समर्थनगर आदी भागांतील नागरिकांनी नालेसफाईच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी नाल्यांची रुंदी कमी झाली असून अतिक्रमण कायम आहे. काही भागांत नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असून सफाईची कामे अपूर्ण अवस्थेत दिसत आहेत.

याहून गंभीर बाब म्हणजे नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने मुसळधार पावसात शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका वाढला आहे. घरांमध्ये पाणी घुसणे, रस्ते जलमय होणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि व्यापारी भागांचे नुकसान होणे अशा समस्या निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थायी समिती सभापतींचे वारंवार अल्टिमेटम, अधिकाऱ्यांच्या बैठका आणि पाहणी दौरे सुरू असतानाही प्रत्यक्षात कामे रखडलेली दिसत असल्याने आदेश केवळ कागदावरच राहिले का, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर अथवा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याबाबतही महापालिका प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

पावसाळ्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शहरासाठी ही परिस्थिती धोक्याची घंटा मानली जात आहे. ७ मेपासून सुरू असलेली नालेसफाई २२ जूनपर्यंतही पूर्ण होत नसेल, तर पावसाळ्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण झाल्याचा दावा महापालिका कोणत्या आधारावर करत आहे, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

  “आदेश झाले, पाहण्या झाल्या, अल्टिमेटम दिले गेले; पण नाले अजूनही गाळातच आहेत. पहिल्याच मोठ्या पावसात शहर तुंबले तर जबाबदार कोण?”स्थानिक नागरिक

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90