पिसादेवी येथे दुर्घटना; तीन चिमुकल्या मुली पोरक्या
हिंदू प्रकाशवार्ता
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
पिसादेवी रोड येथे वैशाली ढाबा परिसरात महावितरणच्या उघड्या अवस्थेतील डीपीमधून परिसरात उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा शॉक लागून ४० वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर नातेवाईकांनी महावितरणच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
सुरेश कचरू साळवे (४०, रा. आंबेडकर नगर, एन-७) असे मृत मजुराचे नाव आहे. ते कामानिमित्त पिसादेवी शिवारातील वैशाली ढाबा परिसरात आले होते. या परिसरात महावितरणची डीपी बऱ्याच काळापासून उघड्या अवस्थेत होती. शनिवारी दुपारी या उघड्या डीपीमुळे परिसरात अचानक विजेचा प्रवाह उतरला. त्यावेळी सुरेश साळवे यांच्या संपर्कात हा प्रवाह आल्याने त्यांना जोरदार शॉक बसला. शॉक इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
सुरेश साळवे हे रोजंदारीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि तीन लहान मुली असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
महावितरणच्या कारभारावर संताप
महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा आणि दुर्लक्षित व्यवस्थेचा आणखी एक निष्पाप बळी गेल्याची प्रतिक्रिया नातेवाईकांनी व्यक्त केली. घटनेनंतर महावितरणच्या कारभाराविरुद्ध त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.