अतिक्रमण, रस्त्यावरच रिक्षांचा तळ, बेशिस्त पार्किंगमुळे स्मार्ट बसही अडकते; शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
प्रतिनिधी सिद्धेश्वर थोर
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती आणि सर्वाधिक वर्दळीच्या औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकात वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. अतिक्रमण, रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या रिक्षा, बेशिस्त दुचाकी पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे हा चौक दिवसातून अनेक वेळा वाहतूक कोंडीत अडकत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की महापालिकेच्या स्मार्ट बसलाही चौकातून वळणे कठीण होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महात्मा फुले चौक हा शहरातील प्रमुख व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतुकीचा केंद्रबिंदू आहे. दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि विविध भागांतून येणारी वाहने या चौकातून प्रवास करतात. मात्र रिक्षा स्टँड उपलब्ध असतानाही अनेक रिक्षाचालक रस्त्यावरच रिक्षा उभ्या करत असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी पडते. त्यातच नाश्त्याच्या हॉटेलांवर येणारे ग्राहक रस्त्यालगत दुचाक्या उभ्या करत असल्याने कोंडीत आणखी भर पडते.
चौकात अनेक व्यापारी आस्थापना, शाळा आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने असल्याने सकाळी, दुपारी आणि सायंकाळी वाहतुकीचा ताण प्रचंड वाढतो. शाळकरी विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. एखादी रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाचे वाहन या कोंडीत अडकल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
महापालिकेकडून शहरभर अतिक्रमण हटाव मोहिमा राबवल्या जात असल्याचा दावा केला जातो. मात्र शहराच्या मध्यवर्ती महात्मा फुले चौकातच अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि रिक्षांची मनमानी कायम असल्याने या मोहिमा केवळ कागदावरच आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतूक शाखेकडूनही येथे कायमस्वरूपी नियोजन किंवा प्रभावी कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवावे, रिक्षा स्टँड शिस्तबद्ध करावा, बेशिस्त पार्किंगवर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि चौकात कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहराच्या मध्यभागी असलेला हा चौक दररोज वाहतूक कोंडीने ठप्प होत असताना प्रशासन मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.