शेख हक्कानी
फर्दापूर प्रतिनिधी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या फर्दापूर गावा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) समोर पावसाचे पाणी साचून तळे निर्माण झाल्याने, ग्राहकांना आणि विशेषतः वयोवृद्ध शेतकऱ्यांना चिखलाच्या आणि गुडघाभर पाण्यातून जीव मुठीत धरून बँकेत जावे लागत आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
*बँकेच्या दारातच पाण्याचे साम्राज्य*
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, थोड्याशा पावसातही फर्दापूरच्या महत्त्वाच्या इमारतींसमोर पाणी साचत आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रवेशद्वारासमोर पाण्याचे मोठे डबके साचले आहे. बँकेत कामानिमित्त आलेल्या एका वयोवृद्ध ग्राहकाला कपडे वर करून या गुडघाभर गढूळ पाण्यातून वाट काढावी लागत आहे, तर काही नागरिक बँकेच्या पायऱ्यांवर अडकून पडले आहेत.
शेतकरी आणि वयोवृद्धांची मोठी गैरसोय
जिल्हा मध्यवर्ती बँक ही परिसरातील शेतकऱ्यांची प्रमुख बँक आहे. पीक कर्ज, पेन्शन, पीक विमा आणि इतर शासकीय योजनांचे पैसे काढण्यासाठी शेतकरी, मजूर आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येथे येतात. मात्र, बँकेत प्रवेश करण्यासाठीच असा जलमय आणि चिखलमय रस्ता पार करावा लागत असल्याने, पाय घसरून पडण्याची आणि अपघाताची मोठी भीती निर्माण झाली आहे.
गटार व्यवस्थेचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
गावातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी योग्य गटार व्यवस्था (Drainage System) नसल्याने ही गंभीर परिस्थिती ओढवली आहे. “शासन आणि प्रशासन झोपेत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या पर्यटन स्थळाशेजारील एका महत्त्वाच्या गावात, जिथे रोज कोट्यवधींची उलाढाल होते, तिथे अशी अवस्था असणे हे स्थानिक ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठे अपयश मानले जात आहे.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
बँकेसमोरील हे साचलेले पाणी तत्काळ उपसून काढावे आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पक्क्या गटारींचे बांधकाम करावे, अशी जोरदार मागणी फर्दापूर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोकाही वाढण्याची शक्यता आहे.