हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर
शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील गुलमंडी रोडवरील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या ‘उत्तम उपहार गृह’ येथे प्रशासनाने अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळणारे अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आले असून, या उपहारगृहाचा परवाना तात्काळ निलंबित करत आस्थापना सील करण्यात आली आहे. या धडक तपासणीत उपहारगृहाचे स्वयंपाकघर अत्यंत अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. अन्न तयार करण्याच्या आणि साठवण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कीटकांचा आणि झुरळांचा सुळसुळाट आढळला. सर्वात संतापजनक म्हणजे, खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वारंवार पुनर्वापर केलेले निकृष्ट खाद्यतेल व वनस्पती तुपाचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय, उपहारगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कोणतेही वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (Medical Fitness Certificate) नव्हते आणि अन्नसुरक्षा नियमांचे अक्षरशः धिंडवडे उडवले जात असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. प्रशासन आणि नियमांची कसलीही पर्वा न करता सुरू असलेल्या या गैरकारभाराची गंभीर दखल घेत एफडीएने तात्काळ परवाना रद्द करत हॉटेल बंद केले आहे. अधिकारींनी जप्त केलेले खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून, अहवाल हातात आल्यावर संबंधितांवर आणखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या दणक्यामुळे शहरातील खानावळी आणि उपहारगृह चालकांचे धाबे दणाणले आहेत.