लासूर स्टेशन येथे आषाढी एकादशीनिमित्त अभंग, भजन व महाप्रसादाचा भक्तिमय संगम
हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी
लासूर स्टेशन : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त स्वर-शारदा संगीत अकॅडमी आणि नवतरुण भजनी मंडळ, लासूर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विठ्ठल गीती गावा–२०२६’ हा भक्तिमय संगीत सोहळा विश्वकर्मा मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सुमारे ३०० वारकरी व विठ्ठलभक्तांनी उपस्थित राहून विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिरसाचा आनंद लुटला.
कार्यक्रमात बालकलाकारांसह नवतरुण भजनी मंडळाच्या सदस्यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव आदी संतांच्या अभंगांचे सुरेल सादरीकरण करून वातावरण भक्तिमय केले. संगीत अलंकार प्रा. अण्णासाहेब आढाव यांच्या भावपूर्ण गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पुणे येथील चैतन्य शिवगंध यांनी पखवाजावर, तर नागपूरचे सम्यक रंगारी यांनी तबल्यावर उत्कृष्ट साथसंगत करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्हद्वारे करण्यात आले.
यावेळी रवी चव्हाण, संदीप अमराव, सुनील पाखरे आणि अमोल जाधव यांनी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सहभागी झालेल्या काव्या दाभाडे, हर्षदा परदेशी, स्वराली पठारे, वैष्णवी बोडके, मानवी भुसारे, श्रेयश बडोगे, पूजा परदेशी आणि त्रिवेणी पवार या बालकलाकारांचा नवतरुण भजनी मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवतरुण भजनी मंडळाचे अशोक राऊत, चांगदेव गायकवाड, नवनाथ सोमवंशी, गणेश सोमवंशी, द्वारकादास आव्हाड, सुनील धनवट, बद्रीनाथ बडोगे, राजेंद्र गायकवाड तसेच स्वर-शारदा संगीत अकॅडमीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.