*४ कोटींचे ‘व्हेल उल्टी’सदृश ॲम्बरग्रीस जप्त, आरोपी वनविभागाच्या ताब्यात*
*विश्वास गायकवाड बोरघर माणगांव रायगड* :
सागरी सुरक्षा आणि किनारपट्टीवरील अवैध व्यवहारांवर करडी नजर ठेवणाऱ्या रायगड पोलिसांनी अलिबागमध्ये मोठी कारवाई करत सुमारे ४ कोटी रुपये बाजारभाव असलेला संरक्षित व्हेल जातीचा ‘ॲम्बरग्रीस’ जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती ऑचल दलाल यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय अधिकारी माया मोरे तसेच पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांच्या सूचनेनुसार अलिबाग पोलीस ठाण्याचे विशेष गस्त पथक २६/२७ जुलैच्या रात्री नाईट राऊंडवर होते.
दिनांक २७ जुलै रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास मौजे चाळमाळा येथील जेट्टीजवळ स्कुटी क्र. MH 06 BZ 6341 वर संशयास्पदरित्या घिरट्या घालणाऱ्या एका इसमाला होमगार्ड आणि गस्त पथकाने थांबवले. चौकशीत त्याने नाव राहुल पंढरीनाथ हातणी, वय ३३, रा. चाळमाळा, पो. थळ, ता. अलिबाग असे सांगितले.
त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अंगझडती आणि स्कुटीची तपासणी केली असता डिक्कीमधील कापडी पिशवीत सुमारे ४ किलो वजनाचा व्हेल जातीच्या संरक्षित वन्यजीवाचा उल्टीसदृश पदार्थ मिळून आला. त्याची अंदाजे बाजारभावानुसार किंमत ४,००,००,००० रुपये इतकी आहे. सोबत २५,००० रुपये किमतीची स्कुटीही जप्त करण्यात आली. एकूण ४,००,२५,००० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार ॲम्बरग्रीस बाळगणे, वाहतूक करणे आणि विक्री करणे हा गंभीर गुन्हा असल्याने पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, अलिबाग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
ही कारवाई सहा. पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, पोहवा अजित देशमुख, नितेश वरसोलकर आणि होमगार्ड अनिल राठोड, करण नागावकर, जगदिश पवार, भालचंद्र पाटील यांच्या पथकाने केली.
*जनतेला आवाहन*
पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की समुद्रकिनारी किंवा इतरत्र कुठेही व्हेल माशाची उल्टीसदृश वस्तू आढळल्यास ती स्वतःकडे बाळगू नये. तात्काळ जवळच्या पोलीस ठाणे किंवा वनविभाग रायगड यांना माहिती द्यावी.
रायगड पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आणि त्वरित कारवाईमुळे किनारपट्टीवरील अवैध तस्करीला मोठा चाप बसला आहे.