हिंदू प्रकाशवार्ता, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना शाखेच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे रविवारी (दि. ८) विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
८ जून १९८५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील गुलमंडी परिसरात मराठवाड्यातील पहिली शिवसेना शाखा स्थापन झाली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो. यंदा ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी ९.३० वाजता शाखा कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता सत्यनारायण महापूजा होणार असून, प्रसिद्ध गायक व संगीतकार प्रमोद सरकटे यांच्या ‘स्वरराज ऑर्केस्ट्रा’चा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत मराठवाड्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ छत्रपती संभाजीनगरातून रोवली गेली. गेल्या चार दशकांत पक्षाने सामाजिक, राजकीय आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढविला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने प्रभावी उपस्थिती नोंदविली असून, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची परंपरा पुढेही कायम ठेवली जाईल, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, उपनेते सुभाष पाटील, राज्य संघटक चेतन कांबळे, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडिया, माजी महापौर सुदाम सोनवणे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, विभागीय सचिव धर्मराज दानवे यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.