header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

जिल्हा बँक निवडणुकीत ४५ अर्ज बाद; अनेक दिग्गजांना धक्का

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/IMG_20260609_214511.jpg

संजना जाधव, समीर सत्तार, अण्णासाहेब माने यांच्यासह अनेकांचे अर्ज अवैध; ११३ उमेदवारांचे अर्ज वैध

छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान ४५ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले असून ११३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज बाद झालेल्यांमध्ये आमदार संजना जाधव, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार, माजी आमदार अण्णासाहेब माने, अर्चना पाटील, इंदुमती पाटील यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीअखेर १५८ इच्छुकांनी एकूण २१४ उमेदवारी अर्ज सादर केले होते. सोमवारी सकाळपासून अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार संजना जाधव, रमेश बोरनारे आणि समीर सत्तार यांच्यासह १४ उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आले होते. संबंधित सुनावणीनंतर छाननी प्रक्रिया मंगळवारपर्यंत सुरू होती.

मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी वैध नामनिर्देशनपत्रांची यादी जाहीर केली. त्यानुसार ४५ अर्ज अवैध ठरले, तर ११३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत. आक्षेप घेण्यात आलेल्या १४ अर्जांपैकी तीन अर्ज विविध त्रुटींमुळे बाद ठरल्याचे स्पष्ट झाले.

अर्ज बाद होण्यामागील कारणे

आमदार संजना जाधव यांनी कन्नड मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. मात्र संबंधित संस्थेच्या दोन वर्षांपूर्वीच्या सभासद नसल्याचे आढळून आल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. समीर सत्तार यांच्या मालकीच्या सोयगाव येथील इमारतीत जिल्हा बँकेची शाखा भाडेतत्त्वावर असल्याची बाब छाननीत समोर आल्याने त्यांचा अर्जही अवैध ठरला.

माजी आमदार अण्णासाहेब माने आणि इंदुमती पाटील ज्या संस्थांचे प्रतिनिधित्व करतात, त्या संस्थांचा लेखापरीक्षण वर्ग ‘क’ असल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. याशिवाय रुपचंद गाडेकर, काकासाहेब फरकाडे, सुवर्णा संजय जाधव आणि अर्चना नितीन पाटील यांच्यासह अनेक उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

काहींना दिलासा, काहींना धक्का

आमदार अनुराधा चव्हाण यांचा फुलंब्री मतदारसंघातील अर्ज बाद झाला असला तरी महिला प्रतिनिधी मतदारसंघातील त्यांचा अर्ज वैध ठरला. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा देवयानी कृष्णा पाटील यांचे बिगर शेती संस्था व महिला प्रतिनिधी मतदारसंघातील दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत.

सुहास सिरसाठ यांचा ओबीसी मतदारसंघातील अर्ज बाद झाला, मात्र फुलंब्री मतदारसंघातील अर्ज वैध राहिला. पैठण मतदारसंघातून आमदार विलास भुमरे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. तो वैध ठरल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. वैयक्तिक सभासद मतदारसंघातील एकमेव अर्ज मात्र बाद झाला आहे.

११३ उमेदवार रिंगणात

पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अंबादास दानवे, विलास भुमरे, रमेश बोरनारे, अनुराधा चव्हाण तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अर्जुन गाढे यांच्यासह ११३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

दरम्यान, अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना ११ जूनपर्यंत विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल करता येणार असून, २३ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या निवडणुकीसाठी ४ जुलै रोजी मतदान होणार आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90