सामाजिक संदेश देणाऱ्या प्रतीकांची दयनीय अवस्था, नागरिकांत संताप
छत्रपती संभाजीनगर, मुलींच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या घोषणा दिल्या जातात, जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. मात्र त्याच संदेशाचे प्रतीक असलेले शिल्प आज धूळ, झुडपे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाखाली हरवत असल्याचे विदारक चित्र शहरात पाहायला मिळत आहे. अदालत रोडवरून समर्थ नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) हॉल परिसरात उभारण्यात आलेल्या दोन बालकांच्या अभ्यासरत शिल्पांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे.
धुळीने माखलेले चेहरे, हातातील पुस्तकांवर साचलेली घाण आणि आजूबाजूला वाढलेल्या झुडपांचा विळखा… मुलींच्या शिक्षणाचा संदेश देणाऱ्या या शिल्पांची सध्याची अवस्था पाहून प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या मार्गावर असलेले हे शिल्प दुर्लक्षामुळे अक्षरशः नजरेआड झाले आहे.
विशेष म्हणजे, शिक्षण, समानता आणि सामाजिक जागृतीचा संदेश देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या कलाकृती आज स्वतःच उपेक्षेचे बळी ठरत आहेत. समाजाला प्रेरणा देणाऱ्या प्रतीकांवरच दुर्लक्षाची धूळ साचल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जात असताना अशा सार्वजनिक कलाकृतींच्या देखभालीकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
स्थानिकांच्या मते, शहरातील अनेक चौक, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील शिल्पे व स्मारके अशाच अवस्थेत पडून आहेत. उभारणीवर खर्च होतो; मात्र देखभाल आणि संवर्धनासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा कार्यरत नसल्याने या कलाकृतींचे अस्तित्व धोक्यात येत आहे.
नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने या परिसरातील झुडपे हटविणे, शिल्पांची साफसफाई करणे आणि नियमित देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या अशा शिल्पांचे जतन करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून शहराच्या सांस्कृतिक ओळखीचे जतन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश केवळ सरकारी फलकांवर आणि जाहिरातींमध्ये झळकून उपयोग नाही. त्या संदेशाचे प्रतिनिधित्व करणारी प्रतीकेही जपली गेली पाहिजेत. अन्यथा धुळीत हरवत चाललेले हे शिल्प प्रशासनाच्या संवेदनाहीनतेची आणि सार्वजनिक संपत्तीबाबतच्या उदासीनतेची मूक साक्ष देत राहील, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.