header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या उपचारावेळी गोंधळ; डॉक्टर-परिचारिकेच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002462341.jpg

लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटनेची जिल्हाभर चर्चा; रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचा आरोप, चौकशीची मागणी

छत्रपती संभाजीनगर : लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या उपचारादरम्यान डॉ. पुनम मुंडे आणि सुकेशनी साळवे परिचारिकेमध्ये झालेल्या वादामुळे आरोग्य केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आरोग्य केंद्रातील अंतर्गत मतभेद आणि त्याचा रुग्णसेवेवर होणारा परिणाम याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळखुंटा येथील एक गर्भवती महिला शनिवारी दुपारच्या सुमारास प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. उपचार प्रक्रियेदरम्यान जबाबदारीच्या मुद्द्यावरून महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. पुनम मुंडे आणि परिचारिका सुकेशनी साळवे यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद चिघळला आणि दोघींमध्ये झटापट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा प्रकार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर घडल्याने आरोग्य केंद्रात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

उपस्थित कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या गोंधळाचा परिणाम प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेच्या उपचार प्रक्रियेवर झाल्याची चर्चा परिसरात सुरू झाली. संबंधित महिलेची प्रकृती लक्षात घेऊन तिला पुढील उपचारासाठी प्रथम चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) पाठविण्यात आले. तेथे रात्री शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. माता आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.

घटनेनंतर डॉक्टर आणि परिचारिकेमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. काही तासांतच हा व्हिडिओ जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला. सरकारी आरोग्य संस्थेत रुग्णसेवेपेक्षा कर्मचाऱ्यांतील वाद चर्चेत येत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंतर्गत मतभेदांचा विषय नवीन नसल्याची चर्चा स्थानिक स्तरावर आहे. यापूर्वीही कर्मचाऱ्यांमधील वाद आणि त्याचा परिणाम कामकाजावर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे ताज्या घटनेनंतर पुन्हा एकदा आरोग्य केंद्राच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रुग्णाच्या वडिलांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “मुलीला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आणले होते. मात्र तेथील वादामुळे उपचार प्रक्रियेत विलंब झाला. त्यानंतर आम्हाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जावे लागले. रुग्णसेवेला प्राधान्य मिळाले पाहिजे. या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्याची माहिती मिळाली आहे. व्हायरल व्हिडिओमुळे हा विषय आता केवळ लाडसावंगीपुरता मर्यादित न राहता जिल्हाभर चर्चेचा विषय बनला असून नागरिकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

■ चौकट : व्हिडिओने वाढवली चर्चेची धग

प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. पुनम मुंडे आणि परिचारिका सुकेशनी साळवे यांच्यामधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची चर्चा जिल्हाभर सुरू झाली. काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये दोघींमधील बाचाबाची आणि गोंधळाचे दृश्य दिसत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य केंद्रातील कामकाज, कर्मचाऱ्यांमधील समन्वय आणि रुग्णसेवेची गुणवत्ता याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

■ चौकट : “वाद जुना; चौकशी अहवाल वरिष्ठांकडे”

लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पुनम मुंडे आणि परिचारिका सुकेशनी साळवे यांच्यामधील मतभेद हे नवीन नसून यापूर्वीही अशा तक्रारी समोर आल्या होत्या, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश सावरगावे यांनी दिली. दोघांनाही या पूर्वी रुग्णसेवेला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रसूतीदरम्यान घडलेल्या वादाची चौकशी करण्यात येणार असून संबंधितांना समज देण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असून भविष्यात रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

— डॉ. नागेश सावरगावे

तालुका वैद्यकीय अधिकारी

■ चौकट : “सूचना दिल्या, समज दिली; तरीही वादच… मग कारवाई अटळ!”

लाडसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित डॉ. पुनम मुंडे आणि परिचारिका सुकेशनी साळवे यांच्यामधील वाद नवीन नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर १२ जून रोजी आरोग्य विभागाची बैठक घेऊन दोघांनाही मतभेद विसरून रुग्णसेवेला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही प्रसूती कक्षातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा प्रकार अधिक गंभीर बनल्याचे जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पठाडे यांनी सांगितले.

“आरोग्य केंद्रात रुग्णांची सेवा अपेक्षित असताना कर्मचाऱ्यांमध्येच संघर्ष होत असेल, तर तो केवळ शिस्तभंग नसून आरोग्य व्यवस्थेच्या प्रतिमेलाही धक्का देणारा प्रकार आहे. सूचना देऊनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवून दोषींवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. रुग्णसेवेपेक्षा वैयक्तिक वाद महत्त्वाचे वाटत असतील, तर अशा कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आवश्यक असल्यास कार्यमुक्ती आणि निलंबनाबाबतचा प्रस्तावही आगामी सर्वसाधारण सभेत मांडला जाईल.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90