संतोषराव राठोड यांच्या संकल्पनेतून उपक्रमाला प्रारंभ
शेख हक्कानी
फर्दापूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा. ना. श्री. संजयभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली बंजारा समाजाच्या एकीकरणासाठी, संघटनात्मक बळकटीसाठी तसेच समाजातील विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी ‘बंजारा विकास संघ’ या व्यापक लोकचळवळीची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे राज्यासह देशभरातील बंजारा समाजाला एकत्र आणून सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
देशभरात मोठ्या प्रमाणात विखुरलेला बंजारा समाज हा लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचा समाज मानला जातो. देशात या समाजाची लोकसंख्या १५ कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते, तर महाराष्ट्रातही सुमारे ३ कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असल्याचे मानले जाते. एवढ्या मोठ्या समाजाला एकाच धाग्यात बांधून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती. याच पार्श्वभूमीवर मंत्री संजयभाऊ राठोड यांच्या पुढाकारातून बंजारा विकास संघाची स्थापना करण्यात आली आहे.
या संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांच्या समस्या, अडचणी आणि विकासाच्या गरजा शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे. समाजातील नागरिकांची माहिती संकलित करणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे तसेच शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय प्रश्नांवर मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
संघाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असून समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून समाजबांधवांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार असून विविध प्रश्नांवर एकत्रितपणे उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. समाजातील प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठीही ही संघटना कार्यरत राहणार आहे.
बंजारा समाजाच्या सामाजिक उन्नतीबरोबरच शैक्षणिक प्रगती, युवकांना संधी उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आणि विविध विकास योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वय साधणे हा या लोकचळवळीचा प्रमुख हेतू असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरातील बंजारा समाजबांधवांनी बंजारा विकास संघामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, सदस्य नोंदणी करून सामाजिक चळवळीला बळ द्यावे तसेच आपल्या समस्या, सूचना आणि विचार संघाकडे नोंदवून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.