header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

सुरक्षित समाज आणि नशामुक्त भारत हेच आपले ध्येय…अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1000373074.jpg

: पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे

छत्रपती संभाजीनगर, : महाविद्यालयीन जीवनात मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा योग्य वापर करत कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांच्या प्रलोभनांना ठामपणे ‘नाही’ म्हणायला शिका. एक व्यसनी व्यक्ती केवळ स्वतःचेच नव्हे तर आपल्या कुटुंबाचे आणि संपूर्ण समाजाचेही नुकसान करते. व्यसनमुक्त समाजाची उभारणी ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून सुरक्षित समाज आणि नशामुक्त भारत हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमास एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.आर.आर.देशमुख, क्रीडा संचालक नितीन घोरपडे, पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सचिन काळे, जगदाळे व दिपाली पाटील, पोलीस अधिकारी व कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

पुढे बोलताना पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे म्हणाले की, अंमली पदार्थांचा वापर आपणच थांबवला तर त्यांची साखळी आपोआप तुटेल. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः व्यसनापासून दूर राहून आपल्या कुटुंबाला आणि समाजालाही त्यापासून दूर ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जर कोणते व्यसन करायचेच असेल तर ते अभ्यासाचे, चांगले पुस्तक वाचण्याचे आणि नियमित व्यायामाचे करा. स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी वेळ द्या. दृढ इच्छाशक्ती आणि योग्य दिशा असेल तर कोणत्याही व्यसनावर सहज मात करता येते.

आवड, सवय आणि व्यसन या प्रवासात विवेक, योग्य ज्ञान आणि आत्मनियंत्रण यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. चांगल्या सवयी अंगीकारल्यास व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित व्यायाम, एखादा खेळ आणि वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. सकारात्मक विचार, शिस्त आणि सातत्य यांच्या बळावरच यश, प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त होतो. आपल्यातील क्षमता ओळखून त्यावर काम करणे आवश्यक असून चुकीच्या गोष्टींना ठाम विरोध करत नशामुक्त भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी अंमली पदार्थ विरोधी सामूहिक शपथ घेत व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आर. आर. देशमुख यांनी केले.

 

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90