हिंगोली/गोपाल सातपुते
हिंगोली | समाजातील वंचित, दुर्बल, शेतकरी, मेंढपाळ, भटक्या-विमुक्त, ओबीसी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक दशकांपासून सातत्याने केलेल्या निःस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेत राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांना Bharath Virtual University for Peace and Education यांच्या वतीने “Honorary Doctorate in Social Service” (मानद डॉक्टरेट – सामाजिक सेवा) हा प्रतिष्ठेचा सन्मान बेंगळुरू येथे आयोजित विशेष दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात आला.
मा. रामराव वडकुते यांचे सार्वजनिक जीवन हे समाजसेवा, लोककल्याण आणि विकासाभिमुख नेतृत्वासाठी ओळखले जाते. ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक, धनगर समाज, ओबीसी, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष करून शासनाच्या विविध स्तरांवर प्रभावी पाठपुरावा केला आहे. सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार, पाणी, सिंचन, ग्रामीण विकास आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय सन्मान बहाल करण्यात आला.
मा. वडकुते यांनी महाराष्ट्र राज्य शेळी व मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून पशुपालक आणि मेंढपाळ समाजाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविले. त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी शेतकरी, धनगर समाज, ओबीसी, शिक्षण, सिंचन, पाणीटंचाई, ग्रामीण विकास, सामाजिक न्याय आणि रोजगाराशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडले. सध्या ते राज्यसभेचे खासदार म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असून जनहिताच्या विषयांवर सक्रियपणे कार्यरत आहेत.
Bharath Virtual University for Peace and Education ही संस्था शांतता, शिक्षण, मानवतावादी मूल्ये, सामाजिक विकास आणि सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी मानद डॉक्टरेटसह विविध राष्ट्रीय सन्मान प्रदान करत असल्याचे संस्थेकडून नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग, सार्वजनिक जीवन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांना या संस्थेने मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
बेंगळुरू येथे झालेल्या या समारंभात देशातील विविध राज्यांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी मा. रामराव वडकुते यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मा. रामराव वडकुते म्हणाले, “हा सन्मान माझा नसून समाजासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. या गौरवामुळे समाजाप्रती माझी जबाबदारी अधिक वाढली असून, भविष्यातही जनसेवा, सामाजिक न्याय आणि राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने कार्य करत राहीन.”
या सन्मानाबद्दल महाराष्ट्रासह विशेषतः मराठवाड्यातील विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मा. रामराव वडकुते यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.