एमजीएम ते अरिहंत होंडा (जालना रोड) सर्व्हिस रोड पूर्ण बंद; रस्त्यावरच मातीचा ढिगारा, बाजूलाच १२ फूट खोल खड्डा
हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी सिद्धेश्वर थोर
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम चौकातून अरिहंत होंडा (जालना रोड)कडे जाणारा महत्त्वाचा सर्व्हिस रोड ड्रेनेज लाईनच्या कामामुळे पूर्णपणे बंद करण्यात आला असून, या कामाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. खोदकामातून निघालेली माती थेट रस्त्यावर टाकण्यात आल्याने संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. परिणामी, दररोज या मार्गाचा वापर करणाऱ्या शेकडो वाहनचालक, रुग्णालयात ये-जा करणारे नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना मोठा वळसा घालून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
या कामासाठी रस्त्याच्या कडेला सुमारे १२ फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. मात्र, या खड्ड्याभोवती आवश्यक त्या प्रमाणात सुरक्षित बॅरिकेट्स, रात्री सहज दिसतील असे फ्लॅशिंग वॉर्निंग लाईट्स, रिफ्लेक्टर किंवा अन्य सुरक्षा साधनांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, महानगरपालिकेने “ड्रेनेजचे काम सुरू असल्यामुळे रस्ता बंद आहे” असा सूचना फलक लावला असला, तरी रस्ता बंद केल्यानंतर वाहतुकीचे नियोजन कसे करायचे, पर्यायी मार्ग कोणता आहे, याची कोणतीही स्पष्ट माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक वाहनचालक या मार्गावर येतात आणि रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा मागे फिरून दुसऱ्या मार्गाने जावे लागते. यामुळे वेळ, इंधन आणि श्रम यांचा अतिरिक्त भार नागरिकांवर पडत आहे.
एमजीएम रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, शैक्षणिक संस्था तसेच अनेक व्यावसायिक आस्थापनांकडे जाण्यासाठी हा सर्व्हिस रोड महत्त्वाचा मानला जातो. रस्ता बंद असल्याने रुग्णांचे नातेवाईक, विद्यार्थी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे परिसरात चिखल आणि पाणी साचत असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली असून कामाच्या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की विकासकामे आवश्यक आहेत; मात्र ती करताना नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियोजन याकडे दुर्लक्ष होता कामा नये. रस्ता बंद करण्यापूर्वी पर्यायी मार्गाची स्पष्ट व्यवस्था, सुरक्षित बॅरिकेट्स, इशारा दिवे आणि वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नियुक्त करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. मात्र या ठिकाणी त्याचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे.
नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने कामाच्या ठिकाणी मजबूत बॅरिकेट्स लावावे, रात्री दिसतील अशी प्रकाशयोजना करावी, पर्यायी मार्गाचे दिशादर्शक फलक लावावेत आणि काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून हा महत्त्वाचा सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली आहे.