हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर
शहरातील जालना रोडवरील प्रसिद्ध ‘हॉटेल न्यू अभिजीत काळे बंधू’ अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईमुळे मोठ्या अडचणीत आले आहे. अन्न सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने या हॉटेलचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने या हॉटेलला अचानक भेट देऊन पाहणी केली. या तपासणीदरम्यान हॉटेलचे स्वयंपाकघर (Kitchen) आणि साठवणूक विभाग (Storage Section) कमालीचा अस्वच्छ आणि घाणेरड्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा मानकांच्या परिशिष्ट-४ (Schedule 4) मधील नियमांचे येथे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघड झाले. ग्राहकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण होऊ शकत असल्यामुळे प्रशासनाने कोणतीही कसर न सोडता थेट परवाना निलंबनाची कारवाई केली. राज्यात सध्या प्रशासनातर्फे ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गतच ही धडक कारवाई करण्यात आली असून, हॉटेल चालकांमध्ये यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ”ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही अन्न आस्थापनेची किंवा हॉटेलची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा अन्न व औषध प्रशासनाने या कारवाईनंतर दिला आहे. तसेच सर्व हॉटेल चालकांनी अन्न सुरक्षेचे आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.