header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

पत्रकारिता पाकिटा भोवती फिरते! तेंव्हा?

पंचवीस वर्षापूर्वीचा काळ होता, मी एका शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत असताना एका सांस्कृतिक कार्यक्रमाला एक मोठे पत्रकार उपस्थित होते. तेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांचे भाषण कम बौद्धिक मला आजही आठवते, अगदी जसेच्या तसे. तेंव्हा मला सरकार ह्या शब्दांचा अर्थ कळत नव्हता. मी त्यांनाच सरकार समजायचो. कारण सरकार समजावं असं त्यांचं वागणं होत, बोलणं होत, तत्वनिष्ठ आचार आणि विचार होता. समाजावर त्याच लोकांचा प्रभाव पडतो जे स्वतः सांगतात तसे वागतात. आणि जनता त्यांच्याच सोबत असते जे समाजात जमिनीवर असतात. एक काळ होता जेंव्हा पत्रकार मंडळींना समाजात आदराच स्थान होत. पत्रकार आले की लोकं आदबिन उठत आणि त्यांना बसायला जागा देत. पत्रकार हे समाजाची घान साफ करायचे. पत्रकार म्हणजे सत्य, निष्ठा, त्याग, समर्पण ह्यांचं मूर्तिमंत उदाहरण मी पाहिलेले आहेत. आजही समाजात ही संख्या नाही असं नाही. पण आज त्यांना शोधावं लागत. लक्षणीय संख्या ही कमी झालेली आहे. आज ज्याच्या हातात मोबाईल तो पत्रकार झाला आहे आणि त्यामुळे पत्रकारांची विश्वासार्हता कमी झाली आहे. पत्रकार कधीही कोणत्याही सत्तेचा भाग नसतो, पण हल्ली काही संपादक आणि नामवंत पत्रकार एका राज्यसभेसाठी किंवा एका परिषदेसाठी आपल्या मूल्यांना तिलांजली देतात. सत्तेच्या भोवती फिरत त्यांची ह्यात जाते आणि मग सत्य पाहणारा पत्रकार जेंव्हा सत्तेला कवेत घेतो तेंव्हा पत्रकारिता व विश्वास संपतो. कोणत्याही निवडणुकीच्या अगोदर सर्व राजकीय पक्षाकडून पाकीट मिळतात. कारण प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या बद्दल सकारात्मक बातमी आली पाहिजे. ह्याचा अर्थ असा आहे प्रत्येक पक्ष हा आजही पत्रकारांना भितो पण त्याचा आदर आणि जरब पाकीट पत्रकारांनी पार रया घातली आहे. पत्रकारांची वचक आणि जरब संपायला पाकीट पत्रकारिता जबाबदार आहे. व्यवसाय चालवायचा असतो तेंव्हा काही तडजोडी स्वीकाराव्या लागतात हे मान्य पण ती तडजोड मूल्यांवर आली की त्याला तिथेच ठेऊन सत्य म्हणून आपण आपली बाजू मांडली पाहिजे हे जेंव्हा सुरू होईल तेंव्हा पत्रकारांना परत तेच दिवस येतील. देशाच्या संसदेत पत्रकार निवडून गेलेले तीस वर्षापूर्वीची उदाहरण सापडतात, हल्ली तो योग दुर्मिळ झाला आहे. त्याचे कारण आहे आज पत्रकारांना मोठ्या भेटवस्तू मिळतात, त्यातून आपोआप मौन येणं. मानधन घेणं चूक नाही तो आपला अधिकार आहे पण मानधनाच्या नावाखाले मोठ पाकीट आलं की त्या झाले सत्य झाकोळत जात. आणि सत्य झाकाळाव म्हणूनच पाकीट येतं. समाजाला न्याय देता देता कधी कधी पत्रकार आपल्या फायद्याचा विचार करतो तेंव्हा पत्रकारिता मरते. इथे केवळ पत्रकारिता नाही मरत, इथे मरतो सामान्य जनतेचा विश्वास, माणुसकी वरची श्रद्धा, लोकशाहीवरचा विश्वास, आणि मग शायर सादत हसन मंटो म्हणतात त्या प्रमाणे “कोठे की एक तवायफ़ और एक बिका हुआ पत्रकार एक ही श्रेणी में आते हैं, लेकिन इनमें तवायफ़ की इज़्ज़त ज़्यादा होती है।” ह्याचा अनुभव समाजातून येतो…

               बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा नको तेवढा अभिमान प्रत्येक पत्रकाराला आहे. तो असायलाच पाहिजे कारण पत्रकार मंडळींना आपलं हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारा हा आद्य पत्रकार आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी जेव्हा पत्रकारिता सुरू केली. त्यांनी 6 जानेवारी 1832 ला आपलं दर्पण नावाचं पहिलं वर्तमानपत्र आपल्या सर्वांच्या समोर आणलं, आपल्यातल्या फार कमी पत्रकारांना त्या वेळेसच्या दर्पणच्या अंकाची किंमत माहिती असेल. त्याकाळी शास्त्रींनी दर्पण ची किंमत एक रुपया ठेवली होती ज्याकाळी सोन १९.३९ रुपये तोळा होतं. इतकी प्रचंड किंमत त्याकाळी एका पेपरची होती. कारण बाळशास्त्री जांभेकर यांना विश्वास होता मी माझ्या वर्तमानपत्रांमध्ये लोकांना वाचायसारखं देईल आणि लोक वाचतील. आज काही मंडळी म्हणते इतकं लिहीत जाऊ नका, लोकं वाचत नाहीत. अरे आपण वाचावं असं लोकांना देत नाहीत म्हणून लोकं वाचत नाहीत. पण बाळशास्त्रीना तो विश्वास होता, आज हा विश्वास पार कुठल्या कुठे उडून गेलाय. आज केवळ आपल्याला रद्दी मिळत नाही म्हणून वर्तमानपत्र लावल्या जातत अशी स्थिती आलेली आहे. कारण पत्रकारांनाच वाचायची सवय दुर्दैवाने राहली नाही. पत्रकारांना सत्य असत्याची जाण दुर्दैवाने राहिली नाही. हे वाईट आहे पण दुर्दैवी वास्तव्य आहे. आपल्या वयाच्या विसाव्या वर्षी बाळशास्त्रींनी आपलं सत्य, निष्ठा, त्याग, समर्पण, लोकहित हा विषय धरून आपली पत्रकारिता सुरू केली. पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित, भूगोल या विषयावर बाळशास्त्री सातत्याने लिहीत. मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलगु, पारसी, फ्रेंच, ग्रीक इतक्या भाषेचं ज्ञान बाळशास्त्रांना होत. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल त्यांचा त्याकाळी फ्रान्सच्या राजाकडून मोठा सन्मान झाला होता. आज किती पत्रकारांना नीट मराठी व्याकरण येत. आणि कितींना असं भाग्य लाभतं. आज पत्रकारिता फक्त पैसे कमविण्याच साधन झालं आहे. काही खुशामतखोर लोकांना खुश करण्याचं साधन झाली आहे. पैसे देऊन एखाद्याची भालावल करण्याचं माध्यम पत्रकारिता झाली आहे. योग्य अयोग्य ह्याचा अभ्यास न करता. मला आर्थिक मदत जो करेल त्याचीच बातमी प्रकाशित करण्याची मानसिकता काही पत्रकार मंडळींची झालेली आहे. त्यामुळे पैसे दिले की पत्रकार मॅनेज होतात असंच चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे अशा काही पत्रकारांच्या वागण्यामुळे पत्रकारितेची जरब आणि धाक हा ना सत्तेला राहिलाय, ना सामान्य व्यक्तीला त्याचा आधार राहिला. सध्या वाटतच असेल तर भीती वाटते. पत्रकार असल्याचा अभिमान बाळगायचा असेल तर पत्रकार ह्या विषयाच्या व्याख्या समजून घेतल्या पाहिजे. आम्ही सत्तेचे दलाल नाही आम्ही जनतेचे माध्यम आहोत हा भाव पत्रकारांमध्ये असला पाहिजे. आजही पत्रकार म्हणल्यानंतर जी नावं समोर येतात ती नावं समोर आल्यानंतर एक मनामध्ये आदर येतो, सत्तेलाही त्याची जरब बसते, सत्ता तिथे आजही घाबरते. कारण ही मंडळी आपल्या एका हातात पेन, एका हातात पांढरा पेज आणि खांद्यावर एक शबनम, आणि अंगावरील चारशे रुपयांच्या कपड्यांमध्ये  सत्तेची खोटी लप्तर वेशीवर टांगण्यासाठी तयार असते. आणि सत्याची बाजू निर्भिडपणे मांडत असतात. आश्चर्य आणि वाईट तेंव्हा वाटतं जेंव्हा चौथ्या दर्जाचा नालायक व्यक्ती दारुपिऊन पत्रकारितेला शिवी घालतो आणि त्याचं तोंड बंद करायला तोच पत्रकार लाच घेतो, म्हणजे पत्रकारितेवर पत्रकाराने शिवी ऐकून घेणे आणि नुसती ऐकून नाही तर त्याच्यासाठी त्याच्याच कडून पाकीट घेऊन मौन राहणे म्हणजे आपल्याच आईची दलाली करणे नाही का.?

                मुळात ही गरबड का होते.? आपण बातमीदार आहोत, पत्रकार आहोत, समीक्षक आहोत की संपादक आहोत ह्याचीच नीट माहिती नसते. बातम्या पुरवतो तो बातमीदार असतो. एखाद्या बातमीला चिकित्सक वृत्तीने पाहतो तो समीक्षक असतो, ज्याच्या विचारला आणि स्वभावाला एखादी बाब योग्य पद्धतीने रुचली की तो निर्भिडपने मांडतो तो पत्रकार असतो आणि एखादा विचार चिंतनशील पद्धतीने मांडून त्याच्या पुढचा आपला स्वतःचा विचार मांडतो तो संपादक असतो. आणि जो संपादकांच्या पुढचा विचार करत असतो त्याला प्रज्ञावंत किंवा प्रतिभावंत म्हणतात. आज अशी मंडळी शोधावी लागते. दुर्दैवाने बातमीदार स्वतःला पत्रकार समजतात, पत्रकार समीक्षक होतात, समीक्षक संपादकांच्या भूमिकेत शिरतात आणि संपादक स्वतःला सत्ता समजतात त्यामुळे पत्रकार ह्या विषयाची मोठी गडबड आणि बदनामी होत आहे. पूर्णकालिक पत्रकार, अंशकालिक पत्रकार, स्वतंत्र पत्रकार, आपण नेमकं कशात बसतो हे ही त्यांना माहिती नसतं. पण हे काहीही असलं तरीही आजही पत्रकार मंडळींना सन्मान आहे, मान आहे, सत्तेला त्याची भीती आजही वाटते, फक्त पत्रकारांनी पाकीट घेऊ नये, स्नेह भोजनाला जरूर जावं पण स्नेह भोजनाच्या नावाखाली सत्य लपऊ नये, जे आपल्या मूल्यात बसत नाही. स्वार्थ न पाहता समाजाच्या हिताला प्राध्यान्य दिलं तर आजही लोकं आदर करतात. सत्ता भीती बाळगते. आपल्याला बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, गो.ग. आगरकर, बाबासाहेब आंबेडकर, ना.भा.परुळेकर, दिनू रणदिवे, ह्यांच्या सारखं पत्रकार नाही होता आलं तरी फक्त समाजाने आम्हाला दलाल पत्रकार, पाकीट पत्रकार, थाली पत्रकार, बाटली पत्रकार असं नाही म्हणलं तरी आम्ही उत्तम पत्रकार आहोत असं समजावं आणि आपण आपल्याशी प्रामाणिक आहोत, “ह्या पत्रकाराच जीवन हे पत्रकारितेच्या मुल्यांवर आधारित आहे” असं समाजाने म्हणल तरी आपली पत्रकारिता धन्य होईल…इतकचं…

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90