header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

लखपती दीदी संकल्पपूर्तीसाठी शिवना येथे घराघरात सर्वेक्षण मोहीम; वंचित महिलांना स्वयंसहाय्यता समूहात सामील करण्यावर भर

अजिंठा प्रतिनिधी सय्यद जमीर 

महाराष्ट्र शासनाच्या ‘लखपती दीदी’ उपक्रमांतर्गत राज्यातील एक कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या संकल्पपूर्तीसाठी शिवना प्रभागात सोमवारी (दि. १३) ग्रामसखींच्या माध्यमातून घराघरात सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ग्रामसखींनी प्रत्येक कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देऊन स्वयंसहाय्यता समूहाबाहेर असलेल्या महिलांची माहिती संकलित केली तसेच त्यांना महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सविस्तर माहिती देऊन बचतगटात सहभागी होण्याचे आवाहन केले.

या अभियानाचा मुख्य उद्देश स्वयंसहाय्यता समूहापासून वंचित असलेल्या महिला, अनुसूचित जाती-जमाती, एकल महिला, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे तसेच इतर गरजू महिलांना समूहात समाविष्ट करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. समूहामध्ये सहभागी झाल्यानंतर महिलांना स्वयंरोजगार, उपजीविका वृद्धी, बचत, कर्ज सुविधा, कौशल्य विकास तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध होणार असल्याची माहिती ग्रामसखींनी नागरिकांना दिली.

माननीय मुख्यमंत्री यांनी राज्यातील एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा संकल्प जाहीर केला असून, त्याअंतर्गत राज्यभरात सुमारे ३५ लाख महिलांना स्वयंसहाय्यता समूहात समाविष्ट करून ३.५ लाख नवीन समूह स्थापन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला १२,७२१ नवीन समूह स्थापन करण्याचे, तर सिल्लोड तालुक्याला १,६६८ समूहांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट निश्चित कालावधीत पूर्ण करण्यासाठी तालुकाभर मोहीम स्वरूपात काम सुरू आहे.

शिवना प्रभागात ग्रामसखींच्या दोन ते तीन पथकांची स्थापना करून घरभेटींद्वारे सर्वेक्षण करण्यात येत असून, एकही पात्र महिला या अभियानापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्य शेख सलीम शेख भिकन यांनी महिलांनी स्वयंसहाय्यता समूहात सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केले. ग्रामसेवक रवींद्र गंगावणे यांनीही या अभियानासाठी ग्रामपंचायतीचे पूर्ण सहकार्य राहील, असे सांगत ग्रामसखींच्या कार्याचे कौतुक केले.

ही मोहीम माननीय गटविकास अधिकारी श्री. पगार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक तुषार बर्गड, नवनाथ पवार, प्रभाग समन्वयक प्रवीण लोखंडे तसेच अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90