अजिंठा प्रतिनिधी सय्यद जमीर
सिल्लोड तालुक्यातील शिवना व परिसरातील गावांमध्ये मिरची पिकावर सध्या दुहेरी संकट ओढवले आहे. एकीकडे ‘कोकडा’ (लीफ कर्ल) रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे, तर दुसरीकडे सलग पाऊस न झाल्यामुळे शेतातील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. परिणामी मिरचीची वाढ खुंटत असून शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
शिवना परिसर हा मिरची उत्पादनासाठी ओळखला जातो. यंदा चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. अनेक दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतात वरचे पाणी पोहोचत नाही. नाले, तलाव आणि इतर जलस्रोतांतील पाणीसाठाही कमी झाला असून अनेक बोअरवेलची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे वेळेवर सिंचन करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे.
पावसाअभावी मिरचीची झाडे कमकुवत होत असतानाच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कोकडा रोग वेगाने पसरत आहे. या रोगामुळे पानांची आकसण, नवीन फुटवे न येणे, फुले व फळगळ होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक शेतांमध्ये पिकाचे मोठे नुकसान होत असून यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके व औषधांची वारंवार फवारणी करत आहेत. मात्र, अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. खत, औषधे, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च करूनही पीक वाचवणे कठीण होत असल्याने आर्थिक संकट अधिक गडद होत आहे.
शेतकऱ्यांनी कृषी विभाग व प्रशासनाकडे शिवना परिसरातील मिरची पिकाचे तातडीने सर्वेक्षण करण्याची, कृषी तज्ज्ञांचे पथक पाठवून योग्य तांत्रिक मार्गदर्शन देण्याची, सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याची तसेच बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. वेळेत चांगला पाऊस न झाल्यास यंदाच्या मिरची उत्पादनावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
प्रतिक्रिया
“यावर्षी वेळेवर पाऊस न झाल्यामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान होत आहे. शेतात पुरेसा ओलावा नसल्याने झाडांची वाढ खुंटली आहे. पांढऱ्या माशीमुळे कोकडा रोग झपाट्याने पसरत आहे. खत, औषधे, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च करूनही पीक अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. लवकर चांगला पाऊस झाला नाही आणि प्रशासनाने मदतीसाठी पुढाकार घेतला नाही, तर मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. कृषी विभागाने तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व आवश्यक मदत द्यावी.”
शेख मुशर्रफ, मिरची उत्पादक शेतकरी, शिवना