बिडकीन प्रतिनिधी, पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सेठ मोतीलाल तोतला शैक्षणिक संस्था संचालित ब्लू व्हॅली इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, तसेच त्यांच्यामध्ये आध्यात्मिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संस्थापक अध्यक्ष सतीश तोतला व मुख्याध्यापिका सविता तोतला यांच्या हस्ते भगवान श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून व विधीवत पूजनाने करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर “पांडुरंग… पांडुरंग…” आणि “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या जयघोषाने भक्तिमय झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष सतीश तोतला यांनी सांगितले की, “आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो श्रद्धा, भक्ती, समता, सेवा, शिस्त आणि संस्कार यांचा संदेश देणारा दिवस आहे. संतांनी समाजाला दिलेले विचार, मानवतेचा संदेश आणि वारकरी परंपरेतील एकात्मता प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात अंगीकारावी. आधुनिक शिक्षणासोबत भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे. मुख्याध्यापिका सविता तोतला यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना संत साहित्याचे महत्त्व, विठ्ठल भक्तीची परंपरा आणि आषाढी वारीचे वैशिष्ट्य याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, शिस्त, परिश्रम, सहकार्य आणि समाजसेवेची भावना जोपासण्याचे आवाहन करत, शिक्षणाबरोबरच संस्कार हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीपर गीतांचे सुमधुर गायन केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगांचे सादरीकरण, ओव्या, प्रभावी भाषणे तसेच भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आकर्षक सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेली पारंपरिक वारकरी वेशभूषा. अनेक विद्यार्थी वारकरी पोशाखात टाळ, मृदुंग, तुळशीची माळ, भगवी पताका घेऊन सहभागी झाले होते, तर काही विद्यार्थ्यांनी भगवान श्री विठ्ठल आणि माता रखुमाई यांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा अधिक खुलवली. शाळेच्या प्रांगणात पारंपरिक पद्धतीने रिंगण आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात पाऊले टाकत, फुगडी खेळत आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर शाळेच्या परिसरातून आकर्षक पालखी दिंडी काढण्यात आली. दिंडीत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा गजर आणि वारकरी वेशभूषेमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि सामाजिक ऐक्याचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त, सहकार्य आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करण्याचा संदेश देण्यात आला.