कॉर्नियाला गंभीर दुखापत; घाटी रुग्णालयातील नेत्रशल्य चिकित्सा विभागाच्या तत्पर उपचारांमुळे मिळाली नवी दृष्टी
हिंदू प्रकाशवार्ता : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : खेळत असताना पेन्सिलचा टोक डोळ्यात घुसल्याने चार वर्षीय चिमुकलीच्या कॉर्नियाला (बाह्य नेत्रपटल) गंभीर दुखापत झाली. या गंभीर अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील नेत्रशल्य चिकित्सा विभागाने तातडीने शस्त्रक्रिया करून चिमुकलीची दृष्टी वाचविण्यात यश मिळविले.
दुखापतीनंतर सुरुवातीला मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि संभाव्य खर्च लक्षात घेऊन पुढील उपचारांसाठी तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे नेत्रशल्य चिकित्सा विभागाने सखोल तपासणी करून तातडीने शस्त्रक्रियेचे नियोजन केले.
अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. अर्चना वरे पाटील यांच्या नेतृत्वात डॉ. महेश सोनपेठकर, डॉ. वेणुगोपाल रांगू आणि डॉ. तपन जक्कल यांनी अत्यंत कौशल्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. यावेळी वरिष्ठ निवासी डॉ. मोहन मोरखडे, डॉ. इमाद ख्वाजा तसेच कनिष्ठ निवासी डॉ. मधुश्री, डॉ. सोनिया, डॉ. साक्षी, डॉ. शीतल आणि डॉ. अनुष्का यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले.
शस्त्रक्रियेदरम्यान बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. गायत्री तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक डॉ. प्रेरणा शिंदे व त्यांच्या पथकाने बधिरीकरणाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. तसेच परिचारिका कालिंदी इधटे, यमुना मुंढे, गीता गीते, सोनाली गायकवाड, विकास गायकवाड, अर्चना सांगळे आणि शस्त्रक्रिया कक्षातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
उपचारानंतर चिमुकलीची प्रकृती समाधानकारक असून तिची दृष्टी सुरक्षित ठेवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या यशस्वी उपचाराबद्दल मुलीच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी घाटी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांमुळे दर्जेदार उपचार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, डॉक्टरांनी पालकांना आवाहन केले आहे की, लहान मुलांना पेन्सिल, पेन, कात्री किंवा इतर टोकदार वस्तू हाताळताना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे. डोळ्याला कोणतीही दुखापत झाल्यास वेळ न दवडता त्वरित नेत्रतज्ज्ञांकडे उपचार घ्यावेत. वेळेवर योग्य उपचार मिळाल्यास गंभीर दुखापतीतही दृष्टी वाचविणे शक्य असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.