हिंदू प्रकाशवार्ता/ प्रतिनिधी
सोयगाव,दि.२८ जुलै
तालुका क्रीडा स्पर्धा २०२६-२७ च्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीस संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथील प्राचार्य डॉ.शिरीष पवार व उपप्राचार्य डॉ.रावसाहेब बारोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बैठकीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक, आयोजनाची रूपरेषा,स्पर्धा सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन तसेच विविध शाळा व महाविद्यालयांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी तालुका क्रीडा संयोजक तथा क्रीडा विभाग प्रमुख डॉ.निलेश गाडेकर यांनी सन २०२६-२७ मधील तालुका क्रीडा स्पर्धांचे सविस्तर नियोजन उपस्थितांसमोर मांडले.त्यांनी स्पर्धा पारदर्शक,दर्जेदार व खेळाडूकेंद्रित पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.नुकतीच जिल्हा क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मुकुंद वाडकर यांचा संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच क्रीडा अधिकारी यादव यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याचप्रसंगी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या वतीने गोबरा राठोड यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
बैठकीस तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांचे क्रीडा शिक्षक,प्रतिनिधी व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी तालुक्यातील क्रीडा चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.