बातमी प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाची धाव; व्यापारी, रिक्षाचालक आणि नागरिकांकडून समाधान
छत्रपती संभाजीनगर : गुलमंडी परिसरातील नाल्याच्या साफसफाईनंतर काढलेला गाळ आणि कचरा रस्त्याच्या कडेला टाकून ठेवल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याची बातमी हिंदू प्रकाशवार्ता मध्ये प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्यांना पाठवून नाल्यातून काढलेला गाळ आणि कचरा उचलून परिसर स्वच्छ केला.
गुलमंडी हा शहरातील प्रमुख व्यापारी आणि वर्दळीचा परिसर आहे. नाल्याची साफसफाई झाल्यानंतर काढलेला गाळ रस्त्यालगतच पडून असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. यामुळे रिक्षाचालक, दुकानदार, ग्राहक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे वृत्त हिंदू प्रकाशवार्ता ने प्रकाशित केले होते.
या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन रस्त्याच्या कडेला पडून असलेला गाळ आणि कचरा उचलला तसेच परिसराची स्वच्छता केली. त्यामुळे काही दिवसांपासून नागरिकांना भेडसावत असलेल्या दुर्गंधीच्या समस्येत मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गुलमंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यापारी आस्थापना, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि रिक्षा स्टॅन्ड असल्याने या दुर्गंधीचा परिणाम दैनंदिन व्यवहारांवर होत होता. गाळ हटविल्यानंतर परिसरातील वातावरण पूर्ववत झाल्याने व्यापारी आणि रिक्षाचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीचे स्वागत केले असून भविष्यात नाल्यांची साफसफाई केल्यानंतर काढलेला गाळ त्वरित उचलण्याची व्यवस्था कायमस्वरूपी करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांच्या समस्या प्रकाशझोतात आणून त्यावर कार्यवाही घडवून आणण्यात स्थानिक माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही अनेकांनी नमूद केले.
गुलमंडी परिसरातील ही समस्या मार्गी लागल्याने व्यापारी, रिक्षाचालक आणि नागरिकांनी दैनिक हिंदू प्रकाशवार्ता वृत्तपत्राचे तसेच महापालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.