वैद्यकीय शिक्षणासाठी समाजाचा प्रेरणादायी सहभाग; देहदान चळवळीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), छत्रपती संभाजीनगर येथील शरीररचनाशास्त्र विभागात देहदान चळवळीला समाजाकडून सातत्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिन्यातील सलग सहाव्या देहदानाची नोंद गुरुवारी झाली. विशेष म्हणजे, एका दिवसात दोन ज्येष्ठ नागरिकांच्या पार्थिवदेहाचे देहदान प्राप्त झाल्याने वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी समाजाचे अमूल्य योगदान लाभले आहे.
गुरुवार, दि. 18 जून रोजी कै. गणपतराव कृष्णराव वहाटुळे (89, सिडको, छत्रपती संभाजीनगर) तसेच कै. बाळासाहेब दिगंबर विरधे (66, संभाजीपेठ, छत्रपती संभाजीनगर) यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिवदेहाचे वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान केले. या उदात्त व मानवतावादी निर्णयामुळे एमबीबीएस, बीडीएस आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शरीररचनाशास्त्राचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी मोठी मदत होणार असून वैद्यकीय संशोधनालाही बळ मिळणार आहे.
यावेळी शरीररचनाशास्त्र विभागात देहदात्यांच्या नातेवाईकांचा देहदान प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या महान निर्णयाबद्दल विभागातर्फे शाब्दिक श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना कल्याणकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. स्वप्ना आंबेकर, डॉ. हिजाब अख्तर, डॉ. पल्लवी चव्हाण, ट्यूटर तसेच कनिष्ठ निवासी डॉक्टर उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात देहदान जनजागृती प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि भावी डॉक्टरांच्या कौशल्यविकासासाठी देहदानाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे डॉ. सुक्रे यांनी नमूद केले.
शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना कल्याणकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रमांमुळे देहदानाबाबत समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत असून अनेक कुटुंबे या मानवसेवेच्या कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.
महाविद्यालय प्रशासनाने सर्व देहदात्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “देहदान म्हणजे मृत्यूनंतरही समाजासाठी जगण्याची संधी. एका देहदात्यामुळे शेकडो वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाची संधी मिळते आणि त्यातून भविष्यात हजारो रुग्णांचे जीवन अधिक सक्षम वैद्यकीय सेवेमुळे सुरक्षित होण्यास मदत होते.”
तसेच, “देहदान हे केवळ दान नसून मानवतेची अखेरची आणि सर्वोच्च सेवा आहे. समाजाने या चळवळीत अधिकाधिक सहभागी होऊन वैद्यकीय शिक्षणाला बळ द्यावे,” असे आवाहन शरीररचनाशास्त्र विभागातर्फे करण्यात आले.