जिल्हाधिकारी निवासस्थानावरील नामफलकावर माजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे नाव कायम असल्याचा मुद्दा हिंदू प्रकाश वार्ताने ठळकपणे मांडल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची बदली होऊन सुमारे दोन महिने उलटून गेले होते, मात्र निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरील फलकावर अद्यापही माजी जिल्हाधिकाऱ्यांचेच नाव कायम असल्याचे वास्तव हिंदू प्रकाश वार्ताने छायाचित्रासह प्रसिद्ध केले होते.
या वृत्तामुळे प्रशासनाच्या कारभारातील निष्काळजीपणा समोर आला. जिल्ह्याच्या सर्वोच्च प्रशासकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानावरील नामफलकच अद्ययावत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हिंदू प्रकाश वार्ताने हा मुद्दा उचलून धरल्यानंतर संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली आणि काही दिवसांतच नामफलक बदलण्याची कार्यवाही करण्यात आली.
आता जिल्हाधिकारी निवासस्थानावर विद्यमान जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे नाव असलेला नवीन फलक लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा बदल हिंदू प्रकाश वार्तामध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरच करण्यात आल्याने माध्यमांच्या पाठपुराव्याची आणि लोकहिताच्या प्रश्नांवरील पत्रकारितेची प्रभावी दखल प्रशासनाला घ्यावी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनातील अशा किरकोळ वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या त्रुटींकडे लक्ष वेधून त्यात सुधारणा घडवून आणण्याचे काम हिंदू प्रकाश वार्ताने केले असून, वृत्ताची दखल घेत अखेर नामफलक अद्ययावत झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.