header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ग्रामीण पोलिसांचा योगाभ्यास; निरोगी पोलीस, सक्षम समाजाचा संदेश

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002503398.jpg

छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने गोकुळ मैदानावर विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ६ वाजता पार पडलेल्या या शिबिरात पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यासाचा संकल्प केला.

या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्यासह २०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘योग : कर्मसु कौशलम्’ या संकल्पनेला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात वॉर्मअप, सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन आदी विविध योगासने तसेच प्राणायामाचे प्रात्यक्षिक व सराव करण्यात आला. यंदाच्या ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील तणावपूर्ण व धावपळीच्या जीवनशैलीत योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र म्हणाले की, पोलीस दलातील जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण लक्षात घेता योगाची नित्य साधना अत्यंत आवश्यक आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. योगामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते तसेच मानसिक तणावावर नियंत्रण मिळवता येते, असे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनीही योगाला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले. योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि समाज यांना जोडणारे प्रभावी माध्यम आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितलेल्या अष्टांग योगाच्या तत्त्वांचा अवलंब केल्यास अधिक सक्षम, तणावमुक्त आणि कार्यक्षम जीवन जगता येते, असे ते म्हणाले.

प्राचीन भारतीय योग परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामीण पोलीस दलाने आयोजित केलेल्या या उपक्रमातून ‘निरोगी पोलीस, सक्षम समाज’ हा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासह नियमित योगाभ्यासाची प्रेरणा देण्यात आली.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90