शिवाजीनगरातील उघडी ११ केव्ही विद्युत डीपी बनली जीवघेणा धोका; पावसाळ्यात अपघाताची भीती, नागरिकांमध्ये संताप
सिद्धेश्वर थोर
छत्रपती संभाजीनगर : शहरात एका बाजूला वीज सुरक्षेबाबत जनजागृती केली जाते, तर दुसऱ्या बाजूला महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात घातला जात असल्याचे चित्र शिवाजीनगर परिसरात पाहायला मिळत आहे. परिसरातील एका बोळात उभी असलेली ११ केव्ही विद्युत डीपी अनेक दिवसांपासून उघडी पडली असून, तिच्या आत उच्चदाबाच्या उघड्या तारा, गंजलेले पॅनेल आणि विस्कळीत विद्युत यंत्रणा स्पष्टपणे दिसत आहे. या धोकादायक डीपीकडे महावितरणने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे ही डीपी अशा ठिकाणी आहे, येथून रोज नागरिकांची ये-जा असते. परिसरातील लहान मुले याच भागात खेळतात. डीपीचे दरवाजे तुटलेले असून कोणालाही सहज आत हात घालता येईल, अशी अवस्था आहे. पावसाळ्यात डीपीभोवती पाणी साचल्यास किंवा उघड्या तारांचा संपर्क आल्यास क्षणात जीवघेणा अपघात होऊ शकतो. तरीही संबंधित विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
प्रत्यक्ष पाहणीत डीपीभोवती कचऱ्याचा ढीग, उघड्या केबल्स आणि गंजलेले लोखंडी कपाट दिसून आले. अनेक ठिकाणी वायरचे इन्सुलेशन निघालेले असून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना दिसत नाहीत. डीपीभोवती संरक्षक जाळी नाही, इशारा फलक नाही आणि दरवाजा नाही. अशा अवस्थेतील ही डीपी म्हणजे नागरिकांसाठी अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनली आहे.
काही दिवसांपूर्वी पिसादेवी परिसरात महावितरणच्या डीपीमधून जमिनीत उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून एका मजुराचा जागीच मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही शहरातील धोकादायक डीपींची तपासणी किंवा दुरुस्ती करण्यात आलेली दिसत नाही. त्यातच शिवाजीनगरातील शिवशंकरनगर येथे खेळत असताना तीन चिमुरड्यांना ११ केव्ही विजेचा जोरदार शॉक बसल्याची घटना ताजी असतानाही महावितरणने कोणताही धडा घेतलेला नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्या दुर्घटनेत मुलांचे प्राण वाचले, मात्र त्यांच्या शरीरावर गंभीर भाजल्या गेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला.
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना वारंवार घडत असताना प्रशासन केवळ अपघातानंतर पंचनामे आणि चौकशीपुरतेच मर्यादित राहणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील सर्व उघड्या डीपींचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांना मजबूत दरवाजे, सुरक्षित कुलूप, संरक्षक जाळी आणि आवश्यक सूचना फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.