सिल्लोड, दि. 9 : सिल्लोड शहर पोलिसांनी अवैध गौण खनिज (वाळू) वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर कारवाई करून सुमारे 7 लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. 9) रोजी दुपारी 3.20 वाजण्याच्या सुमारास भराडी रोडवरील हॉटेल अर्जुन परिसरात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये डोंगरगाव (ता. सिल्लोड) येथील बालू नामदेव बोरेडे तसेच सिल्लोड येथील होरेख जहिर होरेख इब्रेश यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2), 49 तसेच गौण खनिज (खान खनिज) अधिनियम, 1957 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान लाल रंगाचा 241 DI मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर (क्र. MH-34-L-6520), ट्रॉली आणि अंदाजे एक ब्रास वाळू असा एकूण 7 लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अनधिकृतरित्या वाळूची वाहतूक करून आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.