जिंतूर, प्रतिनिधी :
*सचिन रायपत्रीवार*
राज्य शासनाने राबविलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश तसेच राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शेतकरी हिताला प्राधान्य देत राज्य सरकारने कर्जमुक्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार अनिल बोंडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय कुटे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अनेक आमदार, भाजपा किसान मोर्चाचे राज्य, जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेले शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यात उपस्थितांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने शेतकरी कल्याणासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचे स्वागत करत, भविष्यातही शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच लोकाभिमुख योजना राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.