बिलोली (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सुरेश सातभाई यांना कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर न्यायवर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमागील कारणांबाबत विविध चर्चा सुरू असल्या, तरी अधिकृत स्तरावर अद्याप कोणतेही सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये त्यांची बिलोली येथे बदली होऊन नियुक्ती झाली होती. त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातील काही बाबींची उच्च न्यायालयाच्या दक्षता (Vigilance) विभागाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या चौकशीबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष जाहीर झालेला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे यांनी बिलोली न्यायालयाला भेट दिल्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेनुसार हेमंत सातभाई यांना कार्यमुक्त करण्यात आले.
या घटनेमुळे न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शिस्त याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. न्यायदान करणाऱ्या संस्थांबाबत जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी उच्च नैतिक मूल्यांचे पालन आणि आवश्यक त्या ठिकाणी प्रशासकीय कारवाई होणे तितकेच महत्त्वाचे मानले जाते.
दरम्यान, चौकशी पूर्ण होऊन अधिकृत निष्कर्ष समोर येईपर्यंत संबंधित व्यक्तीबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर न्यायवर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.