गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका बंद होणार असल्याच्या निर्णयामुळे मोठी चर्चा रंगली आहे. स्टार प्रवाह वाहिनीने टीआरपीचे कारण देत अवघ्या १५२ भागांमध्ये ही मालिका गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, मालिका बंद करू नये अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी स्टार प्रवाह वाहिनीवर टीका करत ‘बॉयकॉट’ची हाकही दिली आहे.

सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित ही मालिका समाजप्रबोधनाचा महत्त्वाचा संदेश देत होती. मात्र, या मालिकेच्या जागी आता ‘सूना येती घरा’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक आणि सामाजिक आशय असलेल्या मालिकांऐवजी पुन्हा एकदा घरगुती वाद, कटकारस्थाने आणि लांबवून दाखविल्या जाणाऱ्या कथानकांना प्राधान्य दिले जात असल्याची खंत अनेक प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहने टीआरपीच्या शर्यतीत आघाडी कायम ठेवण्यासाठी आठ नव्या मालिकांची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, या मालिकेला दूरदर्शनबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे मालिका पुढे सुरू ठेवावी, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती.
दरम्यान, मालिकेत महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनीही या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली आहे. मालिका अवघ्या पाच महिन्यांत संपवली जात असल्याचे दुर्दैवी असल्याचे त्यांनी यापूर्वी म्हटले होते. मालिका सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले; मात्र वाहिनी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली.
पोस्टमध्ये ते म्हणतात, “जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा कुठेतरी नव्या सुरुवातीची चाहूल लागते. कधी कधी थोडंसं थांबणं आणि निवांत होणं गरजेचं असतं. पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी, नव्या जोमाने झेपावण्यासाठी आणि नव्या लढ्यासाठी सज्ज होण्यासाठी.”
यासोबतच त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला असून, “चॅनलवरील मालिका संपत आहे, पण ही गोष्ट इथेच थांबणार नाही. हा लढा सुरूच राहणार आहे,” असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून, चाहत्यांकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे.