नवकार गार्डन येथे भक्ती, साधना आणि आध्यात्मिक ऊर्जेचा संगम
छत्रपती संभाजीनगर, अंतर्मना आचार्य श्री १०८ प्रसन्न सागरजी महाराज यांच्या सान्निध्यात रविवारी नवकार गार्डन येथे आयोजित ‘दर महिन्याला एक उपवास’ हा कार्यक्रम श्रद्धा, भक्ती आणि साधनेचा अनोखा संगम ठरला. यावेळी दिगंबर बीसपंथी समाज, कुशलगड यांच्या वतीने आचार्यश्रींना प्रशस्तिपत्र प्रदान करून ‘युगप्रधान तप चक्रवर्ती’ या मानाच्या उपाधीने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भव्य शोभायात्रेने झाली. नगरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या शोभायात्रेत श्रद्धाळूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. उपाधीचे प्रशस्तिवाचन पतंजली योगपीठाचे मीडिया प्रभारी एस. के. तिजारावाला यांनी केले. कार्यक्रमात आचार्यश्रींच्या मासिक पत्रिकेसह विशेष प्रकाशनाचे लोकार्पणही करण्यात आले.
धर्मसभेत मुनिश्री सामायिक सागरजी महाराज यांनी ध्यान व योगाचे महत्त्व सांगत निरोगी जीवनासाठी नियमित साधनेचे आवाहन केले. आचार्य प्रसन्न सागरजी महाराज यांनी उपस्थितांना दर महिन्याला किमान एक दिवस उपवास करण्याचा, सात्त्विक जीवनशैली स्वीकारण्याचा व समाजात सदाचार-संस्कारांचा प्रसार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
एस. के. तिजारावाला यांनी ‘दर महिन्याला एक उपवास’ हे अभियान निरोगी व जागरूक समाज घडविणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. कार्यक्रमात विक्रमा कनेरिया यांच्या बासरीवादनाने, बाबा सत्यनारायण मौर्य यांच्या कवितांनी तसेच गायक विजय चौहान यांच्या भजनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमास विविध सामाजिक, धार्मिक व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने श्रद्धाळू उपस्थित होते. अशी माहिती प्रचार-प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी दिली.