२२ तासांचा विलंब, दानवेंचा संतप्त पवित्रा आणि अखेर पोलिसांची कारवाई
त्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वेरूळ परिसरात घडलेल्या शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू झाला असून आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी वेरूळ येथे नागरिकांनी चक्का जाम केला होता. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत चक्काजाम मध्ये सहभाग घेत न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वेरूळ परिसरात एका आरोपीच्या शोधासाठी दोन पोलीस कर्मचारी आणि फिर्यादी घटनास्थळी गेले होते. संबंधित फिर्यादी हा वाळू माफियाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून हे पथक आले होते. यावेळी रस्त्याने जाणारे शिक्षक सुरेश बोरसे यांनी “काय झाले?” अशी साधी विचारणा केली. मात्र याच कारणावरून त्यांना मारहाण झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
याप्रकरणी पोलीस अधिकारी यांनी शिक्षकाला मारहाण करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप होत असून त्यानंतर झालेल्या हल्ल्यात सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येक आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कायद्याचे रक्षण करणारेच जर कायदा हातात घेत असतील, तर राज्यातील नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.