शहरातील बेपत्ता महिलांच्या प्रकरणांकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 2021 ते 2025 या कालावधीत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 4,043 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 3,657 महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून 386 महिला अद्याप बेपत्ता आहेत. या प्रकरणांचा तपास सुरू असून पोलीस महा निरीक्षक अश्वती डोरजे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
बेपत्ता महिलांच्या शोधासाठी शहर पोलीस दलाकडून विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जात असून संबंधित महिला शेवटची कुठे दिसली, तिचे संपर्क, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, नातेवाईक व मित्रपरिवार यांची माहिती तपासली जात आहे. तांत्रिक तपासासह विविध जिल्हे आणि राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधून महिलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक प्रकरणांमध्ये घरगुती वाद, कौटुंबिक कारणे, रोजगार, प्रेमसंबंध तसेच इतर वैयक्तिक कारणांमुळे महिला घर सोडून गेल्याचे आढळून आले आहे. अशा महिलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये अद्याप ठोस माहिती हाती न लागल्याने तपास सुरू आहे.
शहरातील वाढत्या लोकसंख्येसह सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अशा तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक तक्रार गंभीरतेने घेतली जात असून तपासात कोणतीही हयगय केली जात नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अद्याप बेपत्ता असलेल्या 386 महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. जुन्या प्रकरणांचाही नव्याने आढावा घेतला जात असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासाला गती देण्यात येत आहे. पोलीस आयुक्त स्वतः या प्रकरणांचा नियमित आढावा घेत असून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत आहेत. बेपत्ता महिलांचा शोध हा केवळ पोलिसांसाठीच नव्हे तर समाजासाठीही महत्त्वाचा विषय असल्याने नागरिकांनीही संशयास्पद माहिती अथवा बेपत्ता महिलांबाबत कोणतीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उर्वरित महिलांचा शोध लावण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून येत्या काळात या प्रकरणांमध्ये अधिक प्रगती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.