छत्रपती संभाजीनगर,: महात्मा गांधी मिशन विद्यापीठात आयोजित १७ व्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय शैक्षणिक विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने विद्यापीठाच्या संगीत व नाट्य विभागाच्या चमुने महाराष्ट्रीयन लोककलांचा बहारदार कार्यक्रम सादर करून विदेशी अभ्यासकांचे मने जिंकून घेतली. रुक्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकरंग मराठी मातीचा…’ या लोककलेवर आधारित कार्यक्रमास अमेरिका, जॉर्डन, मोरोक्को व इतर देशांतील विदेशी पाहुण्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. डॉ.राजू सोनवणे दिग्दर्शित “लोकरंग…” मध्ये नमन नृत्य, गोंधळ, कोळी नृत्य, भारुड, लावणी, अभंग इत्यादी कलाप्रकारांचे सादरीकरण संपन्न झाले. यामध्ये दिलीप खंडेराय, श्रद्धा कांबळे, राहुल खरे, प्रभाकर रेणुके, विक्रम रेणुके, राजू सोनवणे आणि इतर कलावंतांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास नॉर्थ बेंगळुरू विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.बी.के.रवी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. रिहाना सय्यद यांनी केले तर साथसंगत सतीश जोगदंड, गौरव ढोले, प्रसाद तरोडे, महेश नरवडे, गौरव देशमुख, संपदा कटारे, प्रियंका इंदूरकर यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबू घडलिंगे, वाल्मीक जाधव, योगेश सुरडकर, प्रल्हाद रोडे यांनी परिश्रम घेतले.