सर्वसामान्यांवर दंडाचा ‘हातोडा’, पण बसथांबा मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात; महापालिका व वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवर सवाल
छत्रपती संभाजीनगर : शहरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी विविध ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू असताना हेडगेवार रुग्णालयासमोरील बसथांबा मात्र पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला असल्याचे चित्र दिसत आहे. प्रवाशांसाठी राखीव असलेली सार्वजनिक बसथांब्याची जागा सध्या दुचाकी वाहनांच्या बिनधास्त पार्किंगमुळे व्यापली गेली असून, बसथांबा हरवल्याचे वास्तव समोर येत आहे.
बसथांब्याच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांना बसची प्रतीक्षा थेट रस्त्यावर उभे राहून करावी लागत आहे. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या मध्ये उभे राहून प्रवासाची वाट पाहावी लागत असल्याने सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गर्दीच्या वेळेत येथे होणारी वाहतूक कोंडी आणि गोंधळ हे नेहमीचाच झाला आहे.
दुसरीकडे, शहरातील विविध भागांत ‘नो पार्किंग’मध्ये वाहन आढळल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. अनेक वाहनचालकांकडून हजारो रुपयांचा दंड वसूल केला जातो. मात्र डॉक्टर हेडगेवार रुग्णालय समोर सार्वजनिक बसथांबा खुलेआम पार्किंग झोनमध्ये रूपांतरित होत असताना याकडे डोळेझाक का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रुग्णालय परिसर असल्याने येथे रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वाहनांची सतत वर्दळ असते. तरीही बसथांब्याजवळील अतिक्रमणामुळे रस्त्याची उपलब्ध रुंदी कमी झाली असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. काही वेळा या भागात कोंडी निर्माण होऊन संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे.
“बसथांबा प्रवाशांसाठी आहे की वाहनांच्या पार्किंगसाठी?” असा प्रश्न आता परिसरात ठळकपणे चर्चेत येत आहे. सार्वजनिक जागेचा असा वापर कोणाच्या परवानगीने सुरू आहे, याचे उत्तर मात्र अद्याप मिळत नाही. नियम सर्वांसाठी समान असतील तर या ठिकाणी अपवाद का, असा नागरिकांचा संतप्त सवाल करत आहे.
महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन बसथांबा परिसर अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.