header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

कचऱ्याच्या आगीत लिंबाचे झाड खाक; उस्मानपुरा-एमआयटी मार्गावरील पर्यावरणाला धोका

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002476678.jpg

मोकळ्या जागेत कचरा टाकून जाळण्याचे प्रकार सुरूच; नागरिकांकडून कारवाईची मागणी

प्रतिनिधी सिद्धेश्वर थोर 

छत्रपती संभाजीनगर  : उस्मानपुरा परिसरातून एमआयटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत सातत्याने कचरा टाकून त्याला आग लावली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या आगीमुळे परिसरातील एका लिंबाच्या झाडाचा पूर्णतः नाश झाला असून दुसरे झाडही मोठ्या प्रमाणात होरपळले आहे. घटनास्थळी अद्यापही धूर निघत असल्याने कचऱ्याची आग पूर्णपणे विझलेली नसल्याचे दिसून येत आहे.

एमआयटी मार्गालगत असलेल्या या मोकळ्या जागेत काही व्यक्तींकडून घरगुती तसेच इतर प्रकारचा कचरा टाकला जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. कचऱ्याचे ढिगारे वाढल्यानंतर त्यांना आग लावली जात असल्याने परिसरात धूर, दुर्गंधी आणि वायुप्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी पाहणी केली असता जळालेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अजूनही धुराचे लोट निघत असल्याचे आढळून आले. आगीच्या झळा शेजारील लिंबाच्या झाडांपर्यंत पोहोचल्याने एका झाडाचा बुंधा आणि खोड पूर्णपणे जळून काळवंडले असून ते झाड वाळून गेले आहे. दुसऱ्या झाडाच्याही खोडाचा मोठा भाग होरपळल्याचे दिसून आले.

स्थानिक नागरिकांच्या मते, हा प्रकार नवीन नसून अनेक महिन्यांपासून सुरू आहे. कचरा टाकणे, तो जाळणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धुराबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र संबंधित यंत्रणांकडून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना झालेल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पर्यावरणप्रेमींच्या मते, एका प्रौढ वृक्षाचा नाश होणे म्हणजे अनेक वर्षांच्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होय. शहरातील हरित क्षेत्र आधीच कमी होत असताना अशा घटनांमुळे वृक्षसंपदेचे नुकसान होत आहे. याशिवाय उघड्यावर कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. उन्हाळ्यात किंवा कोरड्या हवामानात अशी आग जवळच्या झाडाझुडपांमध्ये पसरल्यास मोठी दुर्घटनाही घडू शकते.

सार्वजनिक जागेत वारंवार कचरा टाकला जात असताना आणि त्याला आग लावली जात असताना संबंधित विभागांकडून प्रभावी नियंत्रण का ठेवले जात नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, परिसराची नियमित स्वच्छता करावी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी देखरेख वाढवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90