header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

सिडको चौकात वाहतुकीचा बोजवारा

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002500042.jpg

रस्ते काम, बेशिस्त रिक्षा थांबे आणि वाहतूक पोलिसांचा अभाव; वाहनांच्या लांबच लांब रांगा, नागरिक संतप्त

सिद्धेश्वर थोर

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या सिडको चौकात रविवारी दुपारी पुन्हा एकदा वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सिडकोकडून हर्सूल टी-पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक सर्व्हिस रोडवर वळविण्यात आली आहे. त्यातच चौक परिसरात काही रिक्षाचालकांनी रस्त्याच्या कडेला आणि मधोमध रिक्षा उभ्या करून प्रवासी वाहतूक सुरू ठेवल्याने काही वेळातच संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

वाहतुकीचा ताण वाढत असताना चौकात वाहतूक पोलीस नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. चारचाकी, दुचाकी, रिक्षा तसेच मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक वाहनचालकांना चौक ओलांडण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.

घटनास्थळी असलेल्या नागरिकांच्या मते, सिडको चौकातील वाहतूक कोंडी ही आता नित्याची समस्या बनली आहे. रिक्षा थांब्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध असतानाही अनेक रिक्षाचालक चौकातच प्रवाशांच्या प्रतीक्षेत थांबत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. त्यातच सुरू असलेल्या रस्ते कामामुळे सर्व्हिस रोडवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एका बाजूला मालवाहू वाहने, दुसऱ्या बाजूला रिक्षांची रांग आणि मधोमध अडकलेली चारचाकी वाहने यामुळे चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. काही वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला, तर अनेकांना कोंडीत अडकून राहावे लागले.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे सिडको चौकासाठी कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करण्याची मागणी केली आहे. रिक्षा थांब्यांचे काटेकोर पालन, बेशिस्त वाहनांवर कारवाई आणि गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आगामी काळात ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शहरातील महत्त्वाच्या चौकांपैकी एक असलेल्या सिडको चौकातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90