header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

इशारा दुर्लक्षित, अखेर दुर्घटना घडलीच!

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/1002509112.jpg

पिंपळाचे झाड विद्युत तारांवर कोसळून डीपीला आग; ‘हिंदू प्रकाशवार्ता’च्या इशाऱ्यानंतरही महावितरण झोपेत

सिद्धेश्वर थोर

छत्रपती संभाजीनगर  : एन-२ येथील विठ्ठलनगर परिसरात  सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी विद्युत तारांवर कोसळल्याने शॉर्टसर्किट होऊन विद्युत डीपीला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र याच ठिकाणच्या धोकादायक परिस्थितीबाबत यापूर्वीच इशारा देण्यात आला असतानाही उपाययोजना न झाल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनास्थळाजवळ महादेव मंदिर असून येथे दिवसभर भाविकांची मोठी वर्दळ असते. परिसरातील मुलेही याच भागात खेळत असतात. तसेच हा रस्ता नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्याचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे फांदी कोसळली त्यावेळी एखादा नागरिक, दुचाकीस्वार किंवा बालक तेथे असता तर मोठी दुर्घटना घडली असती.

वादळामुळे तुटलेली फांदी थेट विद्युत वाहक तारांवर पडल्याने डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यानंतर डीपीभोवती वाढलेल्या कोरड्या गवताने आणि झाडाझुडपांनी पेट घेतला. काही क्षणांतच आगीचे लोळ उठल्याने परिसरात घबराट पसरली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठे नुकसान टळले.

विशेष म्हणजे, याच डीपीभोवती वाढलेल्या झाडाझुडपांबाबत आणि सुरक्षेच्या प्रश्नाबाबत ‘हिंदू प्रकाश वार्ता’ने यापूर्वी वृत्त प्रकाशित करून महावितरणचे लक्ष वेधले होते. मात्र त्यानंतरही साफसफाई, फांद्यांची छाटणी आणि आवश्यक सुरक्षा उपाय करण्यात आले नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून शहरातील अनेक भागांत विद्युत तारांना झाडांच्या फांद्यांचा विळखा पडलेला आहे. अनेक डीपीभोवती गवत आणि झाडाझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट, आग आणि अन्य गंभीर दुर्घटनांचा धोका कायम आहे. काही ठिकाणी वाढलेल्या झाडाझुडपांमुळे दुरुस्ती व देखभालीसाठी कर्मचाऱ्यांना डीपीपर्यंत पोहोचणेही कठीण होत आहे.

या घटनेनंतर नागरिकांनी महावितरणने तातडीने सर्व डीपी आणि विद्युत वाहिन्यांची पाहणी करून धोकादायक झाडांच्या फांद्या छाटाव्यात, डीपीभोवतीची झाडाझुडपे हटवावीत आणि सुरक्षेचे निकष काटेकोरपणे पाळावेत, अशी मागणी केली आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90