छत्रपती संभाजी नगर नितीन दांडगे
शहरातील जटवाडा रोड परिसरात महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या जीवीपीआर आणि अंकिता एजन्सी यांच्या वतीने जलवाहिनी व ड्रेनेस, चेंबर चे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या या कामामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून हे काम सातत्याने सुरू असून, मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेच्या पैशांची कशी उधळपट्टी होते, याचे थेट चित्र येथे पाहायला मिळत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सतत पडणाऱ्या पाण्यामुळे खोदलेल्या चरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल आणि पाणी साचले आहे. रस्त्याच्या कडेला मातीचे मोठे ढीग साचल्याने जटवाडा रोडवरील रहदारीला प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यात अशी कामे काढणे म्हणजे नागरिकांसाठी एक प्रकारे मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास ठरत आहे. निसरड्या रस्त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. खड्ड्यांभोवती कोणतीही संरक्षक यंत्रणा किंवा बॅरिकेड्स लावलेले नसल्याने, रात्रीच्या वेळी एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात काही हानी झाल्यास त्याला मनपा जबाबदार राहणार की संबंधित एजन्सी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ”एकीकडे सुशोभीकरणाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे चांगला रस्ता तोडून चिखलाचे साम्राज्य निर्माण करायचे, हा मनपाचा अजब कारभार थांबला पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, तसेच उखडलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करून द्यावा; अन्यथा मनपा आणि GVPR एजन्सीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
चौकट
प्रशासकीय समन्वयाचा अभाव; जनतेला वेठीस धरू नका!
महानगरपालिकेचे विविध विभाग आणि कंत्राटदार एजन्सी यांच्यात कोणताही मेळ नसल्याचे यावरून स्पष्ट होते. उन्हाळ्यात संपूर्ण वेळ असताना कामे न करता, नेमका पावसाळा सुरू झाल्यावरच प्रशासनाला जाग का येते? काम पूर्ण झालेल्या भागात पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे आणि रहिवाशांचे अतोनात नुकसान होत आहे.
चौकट
लाखोंचा खर्च पाण्यात; तयार सिमेंट रस्ता आणि पेव्हर ब्लॉक उखडले!
अतिशय संतापजनक बाब म्हणजे, या भागात काही दिवसांपूर्वीच सिमेंटचा उत्तम रस्ता तयार करण्यात आला होता आणि रोडच्या बाजूला लाखो रुपये खर्च करून पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र, जलवाहिनी टाकण्यासाठी हे पूर्ण झालेले काम आता जेबीसीच्या साहाय्याने पूर्णपणे उखडून टाकण्यात आले आहे
रस्ता बनवण्यापूर्वी जलवाहिनीचे नियोजन का केले गेले नाही? आधी रस्ता बनवून त्यावर लोकांचा पैसा खर्च करायचा आणि नंतर पाईपलाईनसाठी तो तोडायचा, हा कुठला कारभार? यामुळे नागरिकांच्या करातून गोळा झालेल्या पैशांचा हा सरळ-सरळ अपव्यय आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा प्रकार असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.